डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात  पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याला अ‍ॅड. पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला तसेच भावे याने संशयित आरोपी कळसकर आणि सचिन अंदुरे यांना बरोबर घेऊन डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यापूर्वी घटनास्थळाची पाहणी केली, असे सीबीआयकडून दोषारोपपत्रात म्हटले आहे. अ‍ॅड. पुनाळेकर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कळसकरने ठाणे येथील खाडी पुलावरून पिस्तूल फेकून दिले. भावे याने कळसकर आणि अंदुरे यांच्याबरोबर घटनास्थळाची पाहणी केली. डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून कसे पसार व्हायचे, याबाबतची माहिती दिल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. सीबीआयचे तपास अधिकारी आर. आर. सिंग आणि विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी बुधवारी दोषारोपपत्र दाखल केले.

३ सप्टेंबर २०१६ रोजी डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०१९ रोजी संशयित आरोपी कळसकर आणि अंदुरे यांच्या विरोधात दोषारोपपत्र करण्यात आले. कळसकर याला हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्याने दिलेल्या कबुली जबाबातून अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांची नावे पुढे आली. त्यानंतर या दोघांना मे २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. भावे सध्या कारागृहात न्यायालयीन कैदेत आहे. अ‍ॅड. पुनाळेकर यांना न्यायालयाकडून या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. कळसकरची  न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी मी आणि अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती कळसकरने सीबीआयला दिली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar murder cbi supplemental chargesheet adv sanjiv punalekar vikram bhave zws
First published on: 22-11-2019 at 02:50 IST