पुणे : एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळताच सभा मंडपाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.

एकवीरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील सोयी सुविधांची पाहणी डाॅ. गोऱ्हे यांनी केली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र एकविरा माता मंदिर असून, ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येईल. या परिसरात येणाऱ्या भाविकांकरिता वाहनतळ, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित विविध कामे प्रलंबित आहेत.

‘पीएमआरडीए’ व ‘एमएमआरडीए’च्या वतीने कामे करण्यात येत असून, दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत दिवाळीनंतर विधान भवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येईल.’

दरम्यान, ‘नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्यसेवा सुविधा आणि पार्किंग समस्येचे निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे,’ अशी सूचना गोऱ्हे यांनी केली.