पुणे : खराडी पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गु्न्हा दाखल करण्यात आला.

खराडीतील एका हाॅटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपींची न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. खराडीतील एका हाॅटेलमध्ये झालेल्या पार्टीपूर्वी आरोपींनी अशा पद्धतीच्या पार्टीचे आयोजन एप्रिल आणि मे महिन्यात केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमधून महिलांशी झालेला संवाद, पार्टीची छायाचित्रे, चित्रफीत मिळाली असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते

डाॅ. खेवलकर यांच्याविरुद्ध एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. डाॅ. खेवलकर यांनी खराडीतील हाॅटेलमध्ये यापूर्वी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तरुणींना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली होती. त्यानुसार राज्य महिला आयेगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना नुकतेच दिले. याबाबत महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पत्र देण्यात आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी डाॅ. खेवलकर यांचा दुसरा मोबाइल संच, कॅमेरा, लॅपटाॅप जप्त केला आहे, तसेच संबधित हाॅटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरण साठविणारे यंत्र (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात एक महिलेने सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली आहे.

२०२२ ते जून २०२५ या कालावधीत डाॅ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. महिलेची संमती नसताना ही छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता ७७, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (ई ) अन्वये डाॅ. खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.