पुणे : ‘आधुनिक वाचन संस्कृतीचा पाया खऱ्या अर्थाने संत साहित्याने घातला,’ असे प्रतिपादन राज्य साहित्य संकृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी केले.
अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस यांच्या वतीने ‘पुस्तकांचा मान्सून सेल’ या उपक्रमाच्या निमित्त ‘वाचन-विचार’ या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘पाचशे वर्षे आपला साहित्य व्यवहार संतांच्या लेखणीवर आधारलेला होता. संतांचे साहित्य घ्यायचे आणि त्याचे निरूपण करण्याची मोठी परंपरा इथे होती. त्यांनी लोकांचे वैचारिक भरणपोषण केले. संत नामदेवांनी उत्तर भारतात वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवला. त्याचप्रमाणे कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून वारकऱ्यांनी संतांच्या विचाराचा प्रचार, प्रसार केला. त्याचा परिणाम देशातील इतर भाषांच्या साहित्यातही दिसून येतो. मराठी भाषेत बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानेश्वरीची पहिली आवृत्ती छापली आणि तिथून मुद्रण संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.’
‘वारकरी संप्रदाय, संप्रदायाच्या बाहेरचे लोक आणि अभ्यासक यांनी तुकोबांच्या अभंगांचा, त्यावर आधारलेल्या साहित्याचा अभ्यास केला. त्याचीही मोठी परंपरा या राज्यात आहे. त्या परंपरेचा मागोवा घेताना संस्कृतीचा इतिहासही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतो, कारण तुकोबा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक पुरुषच आहेत,’ असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
‘अध्यक्षपदावरून दूर करण्याचा प्रयत्न’
‘अद्यापही मी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आहे,’ असे सांगत, ‘कित्येक वर्षे त्या पदावर आहे. अनेकांनी मला बाजूला करायचा प्रयत्न केला. मीही त्या पदापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजूनही ते कोणाला जमले नाही,’ अशी टिप्पणी डॉ. सदानंद मोरे यांनी केली.
संस्कृत ही देवभाषा आहे, यावर काही प्रमाणात वाद होतील. मात्र, मराठी ही नक्कीच सुंदर भाषा आहे. ती संतांनी घडवलेली भाषा आहे.- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ