शरीर आणि मन हे दोन शब्द दिसतात वेगवेगळे; पण तरीही ते एकमेकांशी संलग्न आहेत. शरीर थकले, पण मनाची उभारी असेल, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही बाहेर पडण्याचे सामर्थ्य मिळू शकते. याच्या उलट म्हणजे मन खचले आणि शरीर धडधाकट असेल, तरी फारसा काही उपयोग नाही. या दोन्हींना सक्षम ठेवणे खूपच गरजेचे असते आणि हेच १० ऑक्टोबरचा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ सांगतो आहे. मानसिक आरोग्य राखायचे कसे, याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. संज्योत देशपांडे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
मन आपल्याशी बोलते का?
- आपले मन आपल्याशी नेहमीच बोलत असते, पण त्याचे बोलणे आपल्यापर्यंत पोहोचतेच असे नाही. मन आपल्याला वेगवेगळ्या सूचना देत असते, पण त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. जर मनाच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात, असे वाटत असेल, तर त्यासाठी मनाशी मैत्री करायला हवी. मनाकडे लक्ष द्यायला हवे. शरीराच्या काळजीप्रमाणेच मनाचीही काळजी घ्यायला हवी. मनाची स्वत:ची म्हणून एक परिभाषा असते. शारीरिक व्याधी होऊ नयेत म्हणून मन आपल्याला अनेक गोष्टी सोप्या करून आपल्या वागण्यातून सांगत असते. त्या आपण समजून घेणे गरजेचे आहे. आपण मनाला कायमच गृहीत धरतो, पण तसे करायला नको. मनाकडे दुर्लक्ष न करता, त्याच्या सूचना समजून घ्यायला हव्यात. मनाची काही कुरबुर सुरू असेल, तर वेळीच मानसपोचारतज्ज्ञाची भेट घ्यायला हवी. मनाच्या आजारात कोणताही आडपडदा न ठेवता वेळीच मदतही मागता यायला हवी. यात काही कमीपणा नाही हे समजून घ्यायला हवे. मनाची भाषा समजून घेतली, की दैनंदिन जीवनातील आपल्या आयुष्यातील अनेक समस्या, ताणतणाव यांच्यापासून दूर राहता येऊ शकते.
मन आपल्याला कोणकोणत्या सूचना देते?
- ढोबळ मानाने सांगायचे, तर झोप, नातेसंबंधांवर होणाऱ्या परिणामांपासून सातत्याने येणाऱ्या अस्वस्थतेपर्यंत विविध सूचनांचा त्यात अंतर्भाव असतो. या झाल्या मानसिक सूचना; तर तोंडाला कोरड पडणे, सतत येणारा घाम, खूप भूक किंवा अजिबात भूक न लागणे, त्वचेची समस्या, डोकेदुखी, दमणे-थकणे यांसारख्या शारीरिक समस्यांमधून या सूचना मिळतात. व्यसनाधीनतेत वाढ होणे, स्वतःच्या अथवा इतरांच्या जिवाची पर्वा न करता बेफामपणे वागणे या शारीरिक सूचना आपल्याला मिळत असतात. याचबरोबरच कामात अतिव्यग्र राहणे अथवा कामावरच न जाणे, नखे खाणे, स्वतःकडे जाणीवपूर्वक होणारे दुर्लक्ष, या वर्तनांतून मिळणाऱ्या सूचना आहेत. या सूचनांमधून स्व-अभ्यास करून, कोणत्या सूचना किती दिवस मिळत आहेत, हे समजून घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक ठरते.
तुम्ही मनावर उपचार करण्यासाठी काय करता?
- विचार, भावना आणि वर्तन या तिन्हींच्या संयोगाने मनाचे कार्य व्यवस्थित असते. विविध मानसोपचारपद्धती उपचारांसाठी वापरून या तिन्हींमध्ये सुसंगतता साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो. विविध भावना कशा हाताळता येतील, टोकाचे अथवा हटवादी-अविवेकी विचार कसे टाळता येतील, यासाठी प्रयत्न केले जातात. मनात साचलेल्या चुकीच्या धारणांपासून त्याला पळून जाण्यासाठी नाही, तर त्या धारणांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारे पाठबळ आम्ही आलेल्या व्यक्तीला संवादातून, त्याच्याच विचारांना योग्य दिशा देऊन आणि गरज असेल तेव्हा योग्य त्या औषधोपचारांचा आधार घेऊन देतो. यायोगे आम्ही तात्पुरत्या स्वरूपाची मानसिक अक्षमता निर्माण झालेल्या व्यक्तीला वैचारिक सक्षमता देण्याचे काम करतो.
मनाला सक्षम करायचे असेल, तर काय काय करता येऊ शकते?
- आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार, म्हणजेच स्वतःचा स्वीकार करण्याची क्षमता सर्वांत आधी निर्माण करायला हवी. आपले दिसणे, असणे म्हणजेच आपला रंग-उंची यात आपण फारसा बदल विशिष्ट वयानंतर करू शकत नाही. पण, आपले मन सक्षम करण्यासाठी कोणत्याही वयात प्रयत्न करू शकतो. स्व-स्वीकारापासून स्व-विकासापर्यंत आणि या दोन्हींतून व्यक्तिमत्त्व विकसनाकडे होणारी वाटचाल नक्कीच सुखावह होऊ शकते. आपल्या आयुष्याचे ध्येय, उद्दिष्ट ठरवल्यास आपल्या मनाकडून मिळणाऱ्या सूचना योग्य प्रकारच्या असतील आणि कोणत्याही परिस्थितीत विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा अवलंब करून वागल्यास आपली परिस्थितीवरील पकड सुटणार नाही. स्वयंपूर्ण आणि विकसित असे जीवन घडवण्यास यातून मदत होऊ शकते. निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होऊ शकते. हे सगळे साध्य करण्यासाठी सातत्य, परिश्रमाची तयारी, नातेसंबंधांची जोपासना, आवश्यक वेळ या सगळ्याचीच मोट बांधण्याची आवश्यकता आहे.
shriram.oak@expressindia.com