पुणे : ‘देशाचा इतिहास काळवंडत असून, वर्तमान भयभयीत झालेले आहे. संविधानाला अभिप्रेत लोकशाही आजही अस्तित्वात आलेली नाही. जगात उजव्या विचारांचे नवनवीन हिटलर जन्माला आले आहेत. केवळ राजकारणी बेईमान नाहीत, तर साहित्यिकही बेईमान आहेत,’ अशी टीका माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि विविध ७५ संस्थांतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सबनीस यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आमदार कैलास पाटील, ललिता सबनीस, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, साहित्यिक विश्वास पाटील, संवाद पुणेचे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘टीका किंवा स्तुती करताना सबनीसांची लेखणी कधी कचरली नाही. त्यांनी मोकळेपणाने टीका केली, तर स्तुतीही मोकळेपणाने केली. निजामाची राजवट असतानाही मराठवाड्याने भाषा, साहित्य, काव्य याचे विस्मरण पडू दिले नाही. मराठवाड्यातून अनेक लेखक, साहित्यिक निर्माण झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान दिले. अनंतराव भालेरावांशी संवाद साधणे आनंददायी होते. कुरुंदकरांनी प्रभावी लेखन केले. रानातील कविता करून ना. धों. महानोर घराघरात गेले.‘डॉ. श्रीपाल सबनीस शिक्षकी भूमिकेतून ते सतत व्यक्त होत राहिले. लेखणीच्या माध्यमातून ते विचार देत राहिले,’ असे शिंदे यांनी सांगितले. ‘रे गड्या’ म्हणत पवार यांनी राजकारणात आणले. आम्ही १९७३ पासून बरोबर आहोत. त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यांनी समतेचे धडे दिले. पवार यांच्यावर अनेक संकटे आली असूनही ते घाबरत नाहीत. ते तलवार घेऊन निघाले आहेत, असेही शिंदे म्हणाले.