लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लठ्ठपणाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी १९७६ मध्ये पुण्यात दवाखाना सुरू करणाऱ्या ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विजया साठे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि आयएलएस विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्वर्गीय डॉ. सत्यरंजन साठे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा निखिल, सून आणि नातू असा परिवार आहे.
मुंबईतून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर मेडिसिना अल्टरनेटिव्हमधून विजया साठे यांनी होलिस्टिक मेडिसिनमध्ये पीएच. डी. संपादन केली. त्यानंतर त्यांनी पुणे आणि मुंबईत एक्यूपंक्चर आणि न्यूट्रिशनमध्ये क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू केली. १९७६ मध्ये पुण्यात लठ्ठपणाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी क्लिनिक सुरू करण्यात त्या अग्रेसर होत्या. लठ्ठपणा हा बैठ्या जीवनशैलीचा परिणाम आहे ही कल्पना त्यांनी लोकप्रिय केली आणि व्यायामाद्वारे आपल्या रुग्णांना तंदुरुस्त राहण्याबद्दल प्रोत्साहित केले. त्यांच्या न्यूट्रिशन थेरपीने त्यांच्या काही रुग्णांमध्ये चमत्कार घडवला.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांना गणपती पावला, मिळाला ‘हा’ प्रसाद!
डॉ. विजया साठे यांनी आहार आणि आरोग्य या विषयावर अनेक लेख लिहिले. किर्लोस्कर नियतकालिकातील विपुल लेखनातून हजारो वाचकांपर्यंत पोचून त्यांनी न्यूट्रिशन थेरपीची ओळख करून दिली आणि लोकप्रिय केली. त्यांनी आहाराविषयी मराठी आणि इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली.