पुणे : शहरातील विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न त्यांच्याच स्तरावर सुटावेत, यासाठी महापालिकेची यंत्रणा क्षेत्रीय कार्यालयांपर्यंत विकेंद्रित करण्यात आली. मात्र, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी काम करीत नसल्यामुळे नागरिकांच्या किरकोळ तक्रारीदेखील सुटत नाहीत. त्यामुळे नागरिक तक्रारी घेऊन महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये येत असल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी दिली.
‘महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याचा उत्साह दिसत नसल्याने येणाऱ्या काळात अधिक काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पालिकेची यंत्रणा नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पारदर्शक केली जाणार आहे,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. आयुक्त म्हणून काम करताना सध्या महापालिकेतील विविध विभागांकडून घेतल्या जात असलेल्या आढाव्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महापालिका आयुक्त म्हणाले, ‘महापालिकेत आल्यापासून गेल्या आठवडाभरात दररोज किमान एक हजार नागरिकांना भेटलो. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने बहुतांश नागरिक महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कार्यालयात येतात, ही वस्तुस्थिती आहे. या तक्रारी खालच्या पातळीवर सुटणे अपेक्षित आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत. मात्र, ते का वापरत नाहीत? हा प्रश्न आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची काम करण्याची यंत्रणा जुनी आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला, तर पालिकेत येणाऱ्यांची तक्रारदारांची संख्या आपोआपच कमी होईल. अनेक कामे निधीअभावी होत नसल्याचा आरोप केला जातो. त्यावरदेखील विचार केला जात असून, पुढील काळात आवश्यक त्या निधीची तरतूद केली जाईल.’
‘सध्या काही ठरावीक लोकच काम करत आहेत, त्यामुळे इतरांकडेही लक्ष दिले जाणार आहे. काम न करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही. मात्र, आता पालिकेच्या कारभारात सुधारणा करून जास्तीत जास्त कारभार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे,’ असे नवल किशोर राम म्हणाले.
‘कर्मचारी भरपूर; पण रस्त्यावर दिसत नाही’
‘शहरातील रस्ते आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी १२ हजार कर्मचारी काम करीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात यातील अनेक कर्मचारी रस्त्यावर कधीच दिसत नाही. प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कर्मचारी काम करताना दिसणे आपेक्षित आहे. मात्र, ते दिसत नाही. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. यासाठी तीन हजार कर्मचारी आहेत. झोपडपट्टी भागातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचतात. कामात पारदर्शकता दिसत नाही. महापालिका यंत्रणा यामध्ये कुठे कमी पडते, याचा अभ्यास केला जाणार आहे,’ आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
‘यंत्रणेत बदल करणे आवश्यक’
‘महापालिकेत वर्षानुवर्षे जुन्याच पद्धतीने कामे केली जात आहेत. राज्यातील इतर महापालिकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून सर्व विभाग एकमेकांशी जोडलेले आहेत. पुणे महापालिकेत ही उणीव जाणवते. महापालिकेच्या कारभारात सुसूत्रता यावी, यासाठी पालिकेतील सर्व विभाग ऑनलाईन जोडले जाणार आहेत. यातून काम न करणाऱ्या लोकांचा शोध घेता येईल आणि कामात पारदर्शकता आणता येईल. यासाठी सध्या महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांची यादी तयार केली जाणार आहे. त्यामधून किती काम पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेणे सोपे जाईल. सध्या शहरात ३५ प्रकल्पांचे काम सुरू असून, या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे,’ असे आयुक्त म्हणाले.