पुणे: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा आणि अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण, काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रविवारी सकाळी ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. आज, सोमवारी सकाळपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस ते बांगलादेशच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पण, पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा आणि कमाल तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा… शेतशिवारांत टोमॅटोचा लाल चिखल;खर्चही निघत नसल्याने पिकांत जनावरे सोडण्याची वेळ

अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ येमेन आणि ओमानच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १००- १२० प्रति वेगाने ते येमेन आणि ओमानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षातील बिपरजॉयनंतर तेज हे अरबी समुद्रातील दुसरे चक्रीवादळ ठरले आहे. या चक्रीवादळाचाही भारतावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. दरम्यान, ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण भारतात सक्रिय झाला आहे. केरळमध्ये सर्वदूर तर तमिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई वगळता राज्याला उकाड्यापासून दिलासा

राज्यात मागील दोन दिवसांपासून काहीसे ढगाळ वातावरण असल्यामुळे कमाल तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. रविवारीही मुंबईत उन्हाच्या झळा कायम होत्या. रविवारी राज्यात सर्वाधित ३६.३ अंश सेल्सिअसची नोंद सातांक्रुजमध्ये झाली आहे. कुलाब्यात ३५.५, डहाणूत ३५.० तापमान होते. विदर्भाला दिलासा मिळाला आहे. विदर्भात अकोल्यातील ३५.९ अंश सेल्सिअस तापमान वगळता अन्यत्र पारा सरासरी ३४ अंशांवर राहिला. मराठवाड्यात परभणीत ३४.४ अंश सेल्सिअस तापमान होते, अन्यत्र पारा सरासरी ३३ अशांवर राहिला. मध्य महाराष्ट्रात सोलापुरात ३५. ८ अंश सेल्सिसची नोंद झाली आहे, अन्यत्र सरासरी तापमान ३३ अंश सेल्सिअसवर राहिले. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.