पावसाळा सुरू होताच विषाणूजन्य आजारांबरोबरच डासांमार्फत फैलावणाऱ्या कीटकजन्य आजारांचे रुग्ण वाढण्यास सुरुवात होते. राज्यातील काही भागांमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर प्लेटलेट या रक्तघटकाची मागणीही वाढत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णाच्या प्लेटलेट १० हजारांपर्यंत आल्यासच प्लेटलेटस् देण्याची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता डासांना प्रतिबंध करण्याबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
पावसामुळे साचलेल्या तसेच साठवलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास होते. त्यातून या काळात डेंग्यूचा धोका वाढतो. पुणे शहरासह राज्यातील काही भागांमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते लक्षणांवरील औषधे आणि संपूर्ण विश्रांती, भरपूर पाणी पिणे यामुळे आठवड्याभरात डेंग्यूचे रुग्ण पूर्ण बरे होतात. मात्र, घाबरुन जाऊन रुग्णालयात दाखल होण्याबाबत आग्रह धरणे, प्लेटलेटची मागणी करणे यामुळे डेंग्यूबाबतचे भयच अधोरेखित होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.
जनरल फिजिशियन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,की रुग्णांना काही काळजीचे लक्षण, लघवीतून रक्त जाणे अशा बाबी दिसत नसतील तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. अलीकडे रुग्णालयात दाखल होण्याबाबत किंवा प्लेटलेट द्या म्हणून रुग्णच आग्रही असल्याचे दिसत आहे. असा आग्रह रुग्णांनी धरू नये. मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्लेटलेट १० हजारांपर्यंत कमी झाले असता रुग्णाला ते बाहेरुन देण्याची गरज भासते. त्यामुळे नागरिकांनी प्लेटलेट देण्याचा आग्रह करणे अनावश्यक असल्याचे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनुरकर म्हणाले,की डेंग्यूचे रुग्ण वाढत असले तरी रुग्णांना असलेली लक्षणे सौम्य आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज क्वचितच पडत असल्याचे डॉ. पेनूरकर यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यू लक्षणीय वाढला आहे. मात्र, संपूर्ण विश्रांती, लक्षणांवर आधारित उपचार, शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे एवढ्या खबरदारीने रुग्ण घरच्या घरी बरे होत आहेत.- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखा.
