पुणे : पावसाळापूर्व कामासाठी पावसाळी गटारे, ड्रेनेजलाइन स्वच्छ करून काढण्यात आलेला राडारोडा आणि गाळ शुक्रवारी शहरात अचानक पडलेल्या पावसामुळे पुन्हा गटारातच गेल्याचे समोर आले. काम झाल्यानंतर काढलेला गाळ संबंधित ठेकेदाराने त्वरित न उचलल्याने आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चेंबरच्या कडेला काढून ठेवलेला गाळ चेंबरमध्येच गेला. दरम्यान, या कामाचे कोणतेही बिल संबंधित ठेकेदारांना देणार नाही, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
शहरात पावसाळ्यात ड्रेनेज, पावसाळी गटारांमध्ये कचरा साचून राहिल्याने पाणी वाहून जात नाही. त्यामुळे अनेक भागांतील नाले, पावसाळी गटारे तुंबून पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील नाले, ओढे, गटारे स्वच्छ करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवून हे काम सुरू करण्यात आले आहे. ३१ मेपूर्वी ही पावसाळी कामे पूर्ण करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये पावसाळापूर्वीची कामे ठेेकेदारांकडून सुरू असून, काढलेला गाळ दुसरीकडे उचलून न टाकता गटाराच्या जवळच ठेवला जातो. त्यामुळे तो पुन्हा चेंबरमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांतील चेंबरची झाकणे तुटलेली असल्याने रस्त्यावरील कचरा, काढलेला गाळ पुन्हा गटारांमध्ये जाऊन चेंबर तुंबण्याची शक्यता आहे, असे वृत्त तीनच दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर महापालिकेेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित ठेकेदारांना काम केल्यानंतर काढलेला गाळ उचलून दुसरीकडे टाकण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले होते.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी गाळ उचलण्याबाबत आदेश दिल्यानंतरही संबंधित ठेकेदारांनी गाळ उचलला आहे की नाही, याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे शुक्रवारी समोर आले. काम केल्यानंतर काढण्यात आलेला हा गाळ आणि राडारोडा उचलण्यात न आल्याने अचानकपणे पडलेल्या पावसामुळे हा गाळ पुन्हा चेंबरमध्ये आणि गटारांमध्ये वाहून गेला. महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने आता पुन्हा हे चेंबर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला निधी खर्च करावा लागणार आहे.
कोट…
पावसाळी गटारे, चेंबर स्वच्छ केल्यानंतर काढलेला गाळ न उचलल्याने तो पुन्हा चेंबरमध्ये गेल्याचे समोर आले आहे. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून, या कामांची बिले संबंधित ठेकेदाराला दिली जाणार नाहीत.- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका