लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील हवेली, बारामती आणि पुरंदर हे तीन तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत. त्यामुळे विहीर पुनर्भरणाची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४२७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र आहेत. त्यांपैकी २७२ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट या विहिरींमध्ये जाणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात वनराई बंधारे आणि विहीर पुनर्भरणाची कामे हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ६० हजार विहिरी आहेत. त्यांपैकी उतारावर असलेल्या ४२७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनासोबत वन, कृषी विभागाकडून पुनर्भरणासाठी आवश्यक ठिकाणे सुचवून ती तालुक्यांना कळविण्यात येत आहेत. हे काम ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. आतापर्यंत २७२ विहिरींची कामे झाली आहेत, अशी माहिती रोजगार हमी योजना शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी दिली.

आणखी वाचा-महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून वीजमीटर बदलणारी टोळी सक्रिय… नागरिकांनी घ्यावी ‘ही’ काळजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विहिरींच्या परिसरात ओढा, नाला, उतारावर असलेल्या विहिरी पात्र करण्यात आल्या असून, कामे झालेल्या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर हे पाणी थेट विहिरींमध्ये जमा होणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने ही कामे सुरू करण्यात आली आहेत. पुरंदर, शिरूर आणि जुन्नर या तालुक्यांत सर्वाधिक विहिरींची कामे झाली आहेत, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.