पिंपरी / नारायणगाव : जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चाकणमध्ये तीन, तर नारायणगाव येथे एक अशा चौघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या. आणखी एक तरुण बेपत्ता आहे. चिंचवडमधील मोहननगर येथे विजेची तार तुटल्याने दोन जण जखमी झाले आहेत.
चाकणमध्ये गणेश विसर्जना दरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. एक जण बेपत्ता असून, शोधकार्य सुरू आहे. या घटना शनिवारी दुपारी बारा ते साडेतीनच्या दरम्यान घडल्या.
अनंतकुमार लालबाबू जयस्वाल (वय २३, रा. चाकण, मूळ उत्तरप्रदेश), संदेश पोपट निकम (वय ३६, रा. बिरदवडी ता. खेड), रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५, रा. राक्षे) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अभिषेक संजय भाकरे (वय २१, रा. कोयाळी) हा बेपत्ता आहे.
याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतकुमार आणि अभिषेक हे वाकी खुर्द येथे भीमा नदीवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यात अनंतकुमार यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
संदेश हे बिरदवडीत खासगी विहिरीत गणेश विसर्जनासाठी गेले होते. विहिरीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रवींद्र हे शेलपिंपळगाव येथे पुलाखाली गणेश विसर्जनासाठी गेले होते. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, गणेश विसर्जनासाठी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील नदीत बुडून अशोक खंडु गाडगे (वय २६ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अशोक आणि काही मंडळाचे कार्यकर्ते हे गणेश विसर्जनासाठी नदीच्या पाण्यात उतरले होते, त्यावेळी तो बुडाला. शनिवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी दहा वाजता त्याचा मृतदेह सापडल्याचे नारायणगाव पोलिसांकडून सांगण्यात आले.
विजेच्या तारेचा धक्का लागल्याने दोन जण जखमी
चिंचवडमधील मोहननगर येथे विजेच्या खांबाला देखाव्याचा गाडा धडकला. त्यामुळे विजेची तार तुटली. त्यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोघांच्या अंगावर तार पडली. विजेच्या धक्क्यात प्रवीण राजेंद्र कुटे (वय २१) आणि अमोल सदाशिव चव्हाण (वय ३९) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.