जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील मर्दानी दसरा प्रसिद्ध असून, या सोहळ्यासाठी श्री मार्तंड देवस्थानने जय्यत तयारी केली आहे. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने गड परिसर उजळला आहे. मर्दानी दसऱ्यासाठी येत्या गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा खंडोबा गडातून सिमोलंघनासाठी कडेपठार दरीतील रमणा या ठिकाणी जाणार आहे. कडेपठारची पालखी आणि खंडोबाची पालखी यांची मध्यरात्री अडीच वाजता भेट होणार आहे.
या दसरा सोहळ्यासाठी हजारो भाविक डोंगरात उपस्थित असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी खंडोबा गडामध्ये असणारा ऐतिहासिक खंडा (तलवार) उचलण्याची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी गेले महिनाभर अनेक तरुण एका हातात तलवार जास्त वेळ उचलण्याची आणि तलवारीच्या कसरती करण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान, नवरात्रात खंडोबा गडामध्ये दररोज विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.