पुणे : बांधकाम व्यावसायिकांकडून ई-रजिस्ट्रेशनद्वारे शुल्क भरून ऑनलाइन पद्धतीने दस्तांची नोंदणी केल्यानंतरही या प्रकारच्या दस्ताला बँकांकडून कर्ज नाकारण्यात येत असल्याने ई रजिस्ट्रेशन प्रणालीद्वारे ई एसबीटीआरवर प्रिंट केलेले दस्त नाकारण्यात येऊ नये. असा दस्त कर्जासाठी ग्राह्य धरावा, अशी सूचना नोंदणी मुद्रांक विभागाने बँकांना केली आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून ई रजिस्ट्रेशनद्वारे दस्त नोंदणी करण्यात येते. त्यावेळी दस्तासाठी आवश्यक शुल्क ऑनलाइन भरून त्याची बँकेत प्रिंट घेण्याच्या ई एसबीटीआर पद्धतीद्वारे दस्त नोंदविला जातो. मात्र अशा प्रकारच्या दस्ताला बँकांकडून कर्ज नाकारण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
एसबीटीआरच्या अनेक प्रिंट काढून त्याद्वारे विविध बँकाकडून कर्ज घेण्याच्या शक्यतेने बँका अशा दस्तांना कर्ज नाकारात आहेत. पार्श्वभूमीवर, बँकाच्या प्रतिनिधींची नोंदणी मुद्रांक विभागाने बुधवारी बैठक घेतली. बँक प्रतिनिधींचे समुपदेशन करून त्यांना ई रजिस्ट्रेशन, ई एसबीटीआर या उपक्रमांची माहिती दिली. तसेच अशा स्वरुपाचे दस्त आल्यास त्या दस्तधारकांना कर्ज नाकारू नका अशी सूचना करण्यात आली.
मुद्रांक शुल्क भरण्यासाठी साधे चलन काढले जाते. त्याची दुसरी पद्धत ई एसबीटीआर (ईलेक्ट्रॉनिक सेक्युर्ड बँक ॲण्ड ट्रेझरी रिसिप्ट) अशी आहे. या पद्धतीत ऑनलाइन पैसे भरून त्याची प्रिंट ही बँकेत जाऊन घ्यावी लागते. त्याची प्रिंट एकच मिळते. एकदा रक्कम भरून त्याची अनेक प्रिंट काढली जाण्याची शक्यता बँकांना वाटते. मात्र तसे होत नाही, याकडे नोंदणी मुद्रांक विभागाने बँकाचे लक्ष वेधले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता थेट दस्त नोंदणी करणे शक्य व्हावे यासाठी २०२१ पासून नोंदणी मुद्रांक विभागाने प्रथम विक्री करारनामा (फर्स्ट सेल ॲग्रीमेंट) प्रकारच्या दस्ताची नोंदणी संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशनमध्ये तशी तरतूद केली आहे. ई एसबीटीआर हा मुद्रांक शुल्क भरल्याचा कायदेशीर आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यात बनावट आणि अन्य गैर प्रकारांना वाव नाही, असे मुद्रांक शुल्क विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ई रजिस्ट्रेशनद्वारे नोंदणीकृत आणि डिजिटली स्वाक्षरी असलेले आणि डिजिटल डॉक्टमेंट ई एसबीटीआरवर प्रिंट करण्यात येऊन मूळ दस्त म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. ई रजिस्ट्रेशन प्रणाली गेल्या पाच वर्षांपासून सुरुळीत सुरू आहे. आतापर्यंत ३१ हजार ७८५ इतक्या दस्तांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती नोंदणी मुद्रांक विभागाने दिली. त्यानुसार, शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह बँकेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अशा प्रकारच्या ईएसबीटीआर वर प्रिंट केलेल्या दस्त नाकारू नयेत. तसेच त्यांना कर्ज देण्यास मनाई करू नये, असे सांगण्यात आल्याची माहिती जिल्हा सहनिंबधक संतोष हिंगाणे यांनी दिली.