|| राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयातशुल्क कमी करण्याचा उपाय फोल; निर्यातदार देशांकडून किंमतवाढ

पुणे : खाद्यतेल, विशेषत: पामतेलाचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने पाम तेलावरील आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, इंडोनेशिया आणि मलेशिया या पामतेल निर्यातदार देशांनी कच्च्या पाम तेलाच्या दरात टनामागे ५० ते ६० डॉलरने वाढ केल्याने दरघटीची शक्यता मावळली आहे.

आंतराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यानंतर पाम, सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने पामतेलावरील आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केली. मात्र आयातशुल्क कमी केले असले तरी पामतेलाची निर्यात करणाऱ्या देशांनी दरवाढ केल्यामुळे दरघट होणार नसल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी पामतेलावरील आयात शुल्क आठ टक्के होते. आयातशुल्क तसेच अतिरिक्त दहा टक्के कर (सरचार्ज) असे एकूण मिळून साडेअठरा टक्के तेल आयातदार व्यापाऱ्यांना मोजावे लागत होते. अर्जेंटिना, ब्राझील या देशात प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून सोयाबीन तेल आयात केले. तणावाच्या स्थितीमुळे युक्रेनमधून होणारी सूर्यफूल तेलाची आयात अपेक्षेएवढी होत नसल्याची माहिती खाद्यतेल व्यापाऱ्यांनी दिली.

वाहतूक खर्च वाढल्याने..

आयातशुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आयात करणाऱ्या देशांकडून तेलांच्या दरात वाढ करण्यात येते, असे निरीक्षण  पुणे मार्केट यार्डातील खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी नोंदविले. परदेशातून जहाजाने (स्टीमर) खाद्यतेलांची निर्यात केली जाते. वाहतूक खर्च वाढलेला आहे. देशांतर्गत कर, वाहतूक खर्च आदी बाबी विचारात घेतल्यास किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात घट होत नाही.

थोडी माहिती.. देशात सर्वाधिक आयात पामतेलाची केली जाते. इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करण्यात येते. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिना, ब्राझील या देशातून सोयाबीन तेलाची आयात केली जाते. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते.

आपली गरज..

खाद्यातेलांच्या आयातीवर भारत अवलंबून आहे. पेट्रोलनंतर सर्वाधिक आयात खाद्यतेलांची केली जाते. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यातेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारतात दरवर्षांला साधारणपणे १२० ते १३० लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. आपल्या देशाची गरज साधारणपणे २१० लाख टन आहे. भारतात ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edible oils import duty inflation from exporting countries akp
First published on: 20-02-2022 at 01:21 IST