लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत, पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची भीती व्यक्त करत शालेय शिक्षण विभागाने शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुला-मुलींची सुरक्षितता, निकोप आणि समतामुलक वातावरण निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेला समिती स्थापन करावी लागणार आहे.

आणखी वाचा-साप चावला? घाबरू नका… सरकार आहे पाठीशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे, हक्कांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. सद्य:स्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी, निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. तसेच समितीचा अहवाल कार्यालयास पाठवण्याच्या सूचनाही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आहेत.