पुणे : ‘केंद्र सरकारने १० वर्षांत १६९ हून अधिक श्रेणींतील कामगारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ‘ई-श्रमिक कार्ड’च्या माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या देश ‘चालवणारे’ आणि देश ‘बनवणारे’ श्रमिकच आहेत. त्यामुळे सरकार श्रमिकांच्या हिताचेच काम करत आहे,’ असेे मत भारतीय मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता मजदूर सेलच्या प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने चॅटर्जी यांच्या हस्ते सभासद ओळखपत्र वितरण आणि ई-श्रमिक कार्ड नोंदणी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सेलचे राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, युवाध्यक्ष दीपक शर्मा, राज्य उपाध्यक्ष जयेश टांक, प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर, ‘भाजप’ व्यापारी संघाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष उमेश शाह, माजी ‘आयपीएस’ अधिकारी विजय चव्हाण या वेळी उपस्थित होते.

‘भारतीय जनता मजदूर सेल म्हणजे कामगार हित असे समीकरण मागील दहा वर्षांत बनले आहे. कामगारांना मजबूर नव्हे, तर मजबूत बनवण्यासाठी सेलच्या माध्यमातून काम करण्यात येते. केंद्र सरकारची कामगारहिताची धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, भारतीय मजदूर सेलच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव, शहरातील कामगाराची ‘ई श्रमिक कार्ड’मध्ये नोंदणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे,’ असे चॅटर्जी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राज्यातील महिला कामगार, रिक्षाचालक आणि असंघटित कामगारांना केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ‘एसटी’ महामंडळाने अचानक सेवा समाप्त केलेल्या हमालांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल,’ असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सावर्डेकर यांनी दिले.ओळखपत्र आणि ‘ई-श्रमिक कार्ड’ची नोंदणी केलेले पदाधिकारी नीलेश मकवाना, ॲड. प्रणाली चव्हाण, यतीन माने, संतोष कसबे, अरुणा कवठेकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र शितोळे यांनी आभार मानले.