पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगले बदल केले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. आगामी काळात महापालिका शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) ओळख, त्याबाबतचे शिक्षण आणि त्याविषयी साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य संधी – कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान’ या विषयावर निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमता (एआय), ड्रोनसारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीत एकही युवक मागे राहू नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवण्यास आगामी काळात प्रयत्नशील आहे’.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन म्हणाले, ‘२०२७ पर्यंत भारताला १२.५ लाख कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांची, दरवर्षी एक लाख प्रमाणित ड्रोन ऑपरेटर आणि सुमारे दहा लाख सायबर सुरक्षातज्ज्ञांची गरज भासणार आहे. दहावी उत्तीर्ण युवकांसाठी डेटा ॲनोटेशन आणि ड्रोन पायलटिंगसारख्या संधी निर्माण होत असून, पदवीधरांसाठी डेटा ॲनालिस्ट आणि ड्रोन टेक्निशियनची पदे खुली होत आहेत.’