शहरात लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई सुरू केली आहे. बिबवेवाडी भागातील आठ जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी लाॅटरी दुकानाचे मालक, कामगारांसह ९४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या आठवड्यात सामाजिक सुरक्षा विभागाने महापालिका ‌भवनसमोर ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागातील लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेले जुगार अड्डे बंद करण्यात आले होते. बिबवेवाडी ‌भागात ऑनलाइन लाॅटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. जुगार खेळणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘आओ चलो खिलाडी, खेल शुरू है बिबवेवाडी’ असे संदेश पाठविण्यात आले होते.

त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी भागातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत ८४ हजार ९३० रुपये, ३२ मोबाइल संच, २७ दुचाकी वाहने असा १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ९४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर, श्रीधर खडके, अविनाश लोहोटे, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, राजेंद्र कुमावत, प्रमोद मोहिते, अण्णा माने, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.