न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतर्फे डिसेंबरमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा प्रयोग सादर करणार आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे अडीच हजार विद्यार्थी या प्रयोगाद्वारे ‘एकी हेच बळ’ हा संदेश देणार आहेत. या अभिवन प्रयोगाची ‘गिनीज बुक’ मध्ये नोंद व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विकास काकतकर, सचिव श्रीकृष्ण कानेटकर आणि रमणबाग प्रशालेचे मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे यांनी शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महानाटय़ाचे सादरीकरण हा ‘झिरो बजेट’ कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
शौर्य, उत्साह, जिद्द, राष्ट्रीय चारित्र्य, मूल्य, संघटन कौशल्य, नियोजन, चैतन्य, नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांचा समुच्चय शिवचरित्रामध्ये आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सादर करण्यातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा धडा मिळणार आहे. शाळेची इमारत हाच या प्रयोगाचा रंगमंच असून नाटकाचे नेपथ्य आणि सर्व साहित्य विद्यार्थी स्वत: तयार करीत आहेत. यापूर्वी ‘जाणता राजा’ मध्ये काम केलेले मुख्याध्यापक भालचंद्र पुरंदरे या महानाटय़ामध्ये शाहिराची भूमिका साकारणार आहेत, असेही काकतकर यांनी सांगितले.
यापूर्वी ‘जाणता राजा’ मध्ये सर्वाधिक अडीचशे कलाकारांचा सहभाग होता. आमच्या प्रयोगामध्ये अडीच हजार विद्यार्थी काम करणार आहेत. या नाटय़ातील एका प्रवेशामध्ये रंगमंचावर काम करण्याची इच्छा खुद्द शिवशाहिरांनी प्रदर्शित केली असल्याचे भालचंद्र पुरंदरे यांनी सांगितले.