पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीतून ही अटक करण्यात आली आहे. या रेव्ह पार्टीत सहभागी सात जणांना तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आज पहाटे आणण्यात आले. त्यांच्या तपासणी अहवालातील माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू होती. त्यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन केले आहे का हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोघांनी मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहेत.
पोलिसांन काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्रांबरोबप पार्टी करीत होते. याबाबत माहिती मिळाली असता, आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी त्या कारवाईमध्ये दारु, गांजा आणि हुक्का हा साठा आढळून आला आहे. तर या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात जावयावर कारवाई झाल्याने आता एकनाथ खडसेंवर टीका केली जाते आहे.
रोहिणी खडसेंचा सध्या बोलण्यास नकार
दरम्यान या सर्व कारवाईनंतर रोहिणी खडसे यांनी मात्र प्रकरणाची माहिती घेत आहे, असे सांगत सध्या यावक बोलायला नकार दिला आहे.