पुणे : ‘जे लोक सत्तेच्या लोभामुळे भगवा विसरतात, धनुष्यबाण गहाण ठेवतात, दहशतवाद्यांना मिरवणुकांत फिरवतात आणि पाकिस्तानचे झेंडे नाचवतात, तेच काही लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली. ‘सोयीने हिंदुत्व आठवणाऱ्यांना ओळखून एकदिलाने त्यांचा मुकाबला करणे आवश्यक आहे’, असेही शिंदे म्हणाले.

पतित पावन संघटनेच्या वतीने आयोजित ‘युती हिंदुत्वाची’ कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपान देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे या वेळी उपस्थित होते.

आमचे व्यापक हिंदुत्व सत्तेची खुर्ची दिसली की बदलत नाही

खुर्ची दिसली म्हणून भगव्याचा रंग बदलणारा हा शिवसेना पक्ष नाही. सत्ता, खुर्ची, मोह आणि माया यापेक्षा विचारधारा मोठी आहे. खुर्ची हा आमचा अजेंडा नसून, ज्या लोकांनी आम्हाला त्या खुर्चीत बसवले त्यांच्या समस्या सोडवणे आणि विकासाचा अजेंडा राबवणे हेच आमचे ध्येय आहे’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले, ‘हिंदुत्व ही संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली. त्या विचारधारेतूनच पतित पावन संघटना उभी राहिली. मात्र, सावरकर आणि त्यांच्या विचारधारेचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप काही लोक करतात, आणि त्यानंतर पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारतात. अशा लोकांबद्दल काय बोलायचे, हा प्रश्नच आहे.’

‘पतित पावन संघटना आणि शिवसेना हे भगव्या रंगाचे दोन मजबूत प्रवाह आहेत. हे प्रवाह एकत्र आले आहेत. जो स्वत्व विसरला, तो देश विसरला; जो देश विसरला, तो अस्तित्व विसरला; आणि जो अस्तित्व विसरला, तो मेला. हिंदू आणि मराठी माणसाला जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या काही मोजक्या संघटनांमध्ये पतित पावन संघटनेचे कार्य फार मोठे आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘चौकशीतून सत्य समोर येईल’

पार्थ पवार यांच्या मुंढवा येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात शिंदे म्हणाले, ‘अजित पवार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यातून सत्य समोर येईल. गैरव्यवहार करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही.’ ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील महायुतीच एकत्र लढेल. जागा वाटपाचा किंवा मैत्रीपूर्ण लढतींचा प्रश्न नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल’, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.