पक्षाच्या प्रचारासाठी देशात आणि राज्यात सर्वदूर फिरत असलेल्या नेतेमंडळींनी जाहीर सभेत बोलताना एखादा स्थानिक प्रश्न मांडला की त्याला श्रोत्यांची चांगलीच दाद मिळते. त्या त्या भागातले असे प्रश्न माहिती करून घेण्याची प्रत्येक नेत्याची स्वत:ची एक पद्धत असते आणि ही माहिती मुख्यत: विमानतळ ते सभेचे ठिकाण या प्रवासात ही नेतेमंडळी घेतात. पुण्यात सध्या सुरू असलेल्या जाहीर सभांमध्ये नेतेमंडळींची ही ‘स्थानिक जाण’ पाहायला मिळत आहे.
मागितलेला नसताना आम्हाला पाठिंबा कशाला देता, पाठिंबाच द्यायचा असेल, तर भाजप आघाडीला द्या नाहीतर भाजपमध्ये विलीन व्हा, असे जाहीर आवाहन भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पुण्यातील महायुतीच्या मेळाव्यात राज ठाकरे यांना केले. असा थेट वार काही कोणालाच अपेक्षित नव्हता. राजनाथ यांनी एलबीटीवरही जोरदार टीका केली. या दोन स्थानिक मुद्यांव्यतिरिक्त मग त्यांचे पाऊण तासांचे भाषण हे राष्ट्रीय राजकारणावर होते. हे मुद्दे राजनाथ यांनी मांडले; पण त्याची पूर्वतयारी लोहगाव ते गणेश कला मंच या प्रवासात झाली होती. उमेदवार अनिल शिरोळे आणि पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर या प्रवासात त्यांच्या बरोबर होते. या प्रवासात बीडकर यांनी मनसेमुळे गेल्यावेळी झालेले नुकसान आणि व्यापाऱ्यांना त्रस्त करणारा एलबीटीचा मुद्दा राजनाथ यांना सविस्तर मांडला आणि मेळाव्यात दोन्ही मुद्दे ‘हिट’ झाले.  
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही सभेला जाण्यापूर्वी स्थानिक मुद्दा माहिती करून घेतात. ही माहिती देण्याचे काम पुण्यात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याकडे असते. सभेला निघण्यापूर्वी किंवा सभेकडे जाताना सभेचे ठिकाण, तिथे आपले कोण आहेत, कोणता मुद्दा भाषणात आला पाहिजे याची चर्चा पवार आवर्जून करतात. त्यानुसार मग भाषणात पक्षाची भूमिका मांडून झाली की ते स्थानिक प्रश्नाला हात घालतात आणि मुळातच पुण्याची चांगली माहिती असल्यामुळे असा मुद्दा ते अधिक फुलवून मांडू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सभेला जाताना आवर्जून स्थानिक प्रश्न व राजकारणाची माहिती घेतलेली असते. त्यामुळे दादाही स्थानिक मुद्यांवर नेहमी टाळ्या घेतात.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी वडगावशेरीतील सभेत बरोबर तिथला टँकर लॉबीचा आणि पाण्याचा प्रश्न मांडला. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झालेल्या दुसऱ्या सभेत कॅन्टोन्मेंट कायदा बदलाचा मुद्दा घेत त्यांनी टाळ्या मिळवल्या आणि गोखलेनगरमधील सभेत पूरग्रस्तांच्या मालकी हक्काचा प्रश्न मांडला. सभेच्या ठिकाणानुसार मुंडे यांचे मुद्दे बदलत गेले, कारण या तिन्ही सभांचा गृहपाठ त्यांनी सभेला निघण्यापूर्वीच केला होता. पुण्यात कोणते मुद्दे यायला हवेत याची माहिती मुंडे यांना बव्हंशी संदीप खर्डेकर, गणेश बीडकर, रवी अनासपुरे, उज्ज्वल केसकर हे कार्यकर्ते देतात.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रचारसांगता सभा १५ एप्रिल रोजी पुण्यात होत आहे. या सभेत पुण्याचा इतिहास, शहराची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा, पुण्यात होऊन गेलेले स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक आदी जी माहिती त्यांच्या भाषणात येणे आवश्यक आहे, ती त्यांच्या कार्यालयाला पुण्यातून देण्यात आली आहे, असे पक्षाचे प्रवक्ते डॉ. सतीश देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
नेते काय करतात…
– निघण्यापूर्वी सभेच्या ठिकाणाची माहिती घेतात
– तिथे आधी कोणाकोणाच्या सभा झाल्या हे विचारतात
– स्थानिक प्रश्न काय, त्याबाबत पक्षाची भूमिका काय ते विचारतात
– ही माहिती घेऊन मग नेते सभास्थानी पोहोचतात