‘शिवाजीराव आढळराव यांच्यामुळेच मी खासदार झालो’ अशी कबुली शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर देणारे आणि ‘आमच्यात गटबाजी नाही, परस्पर सामंजस्य आहे’ असे वारंवार सांगणारे खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेत प्रवेश केला आणि लागलीच आढळराव यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. आढळराव हे राजकारणातील ‘फिक्सर’ असून त्यांच्यामुळे अनेकांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाले असल्याचे बाबरांनी म्हटले आहे. त्यामुळे एकेकाळचे सहकारी खासदार ‘आमने-सामने’ आल्याचे चित्र पुढे आले आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून आढळराव आणि बाबर हे सेनेचे खासदार निवडून आल्याने राज्यभरात चर्चेचा विषय झाला होता. दोघांनी राष्ट्रवादीला सळो की पळो करून या दोन्ही खासदारांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. दोघांचे जमत नाही, त्यांच्यात गटबाजी आहे, बाबरांना बरोबर घेण्यास आढळराव टाळाटाळ करतात, असे चित्र अनेकदा रंगवण्यात आले. तथापि, वेळोवेळी दोघांनीही त्याचा इन्कार केला. भोसरीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बोलताना बाबरांनी आपला जीवनप्रवास प्रथमच उलगडून सांगितला, तेव्हा आढळरावांमुळेच खासदार झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले होते. पाच वर्षांनंतर पुन्हा खासदार होण्यासाठी दोघे इच्छुक होते. तथापि, आढळरावांची पहिल्या यादीत वर्णी लागली, तर बाबरांचा पत्ता कट झाला. विद्यमान खासदार असूनही व संसदीय कामगिरी चांगल्याप्रकारे केली असतानाही उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या बाबरांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली व मनसेशी घरोबा केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी मावळात लक्ष्मण जगताप यांच्यासाठी तर शिरूरमध्ये अशोक खांडेभराड यांच्यासाठी पूर्ण ताकद लावली. चिखलीतील मनसे कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी आढळरावांविषयीची खदखद प्रथमच व्यक्त केली. आढळराव हे राजकारणातील ‘फिक्सर’ आहेत. त्यांच्या फिक्सिंगमुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त झाले. ते दुट्टप्पी असून त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांची ‘नौटंकी’ जनतेला माहिती झाली आहे. खांडेभराडांना खेडची उमेदवारी असताना आढळरावांनी विरोधात काम केले. खांडेभराड यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांशी सुद्धा ते प्रामाणिक राहत नाहीत. विकासाच्या नुसत्याच गप्पा मारून ते जनतेची दिशाभूल करतात, असा चौफेर हल्ला बाबरांनी चढवला. अद्याप आढळरावांनी प्रत्युत्तर दिले नसले तरी यानिमित्ताने दोन्ही खासदार एकमेकांसमोर आल्याचे दिसून येत आहे.