आक्रमक मोहिमेत पुणे विभागात ६० हजार थकबाकीदारांकडे अंधार

वीजबिलाचा नियमितपणे भरणा केला जात नसल्याने ग्राहकांकडील वीजबिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असतानाच आर्थिक संकट निर्माण होण्याची चिन्हे असल्याने महावितरण कंपनीने आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. शून्य थकबाकी या नावाने सुरू केलेल्या या मोहिमेत एखाद्याकडे शंभर रुपयांची थकबाकी असली, तरी वीजपुरवठा तोडला जात आहे. पुणे विभागामध्ये मागील सुमारे वीस दिवसांमध्ये या कारवाईमुळे साठ हजारांहून अधिक थकबाकीदारांकडे अंधार झाला आहे. पुढील काळातही थकबाकीदारांची ही वीजतोड सुरूच राहणार आहे.

वीजबिल थकविले जात असतानात राज्यभर थकबाकीदारांची आणि थकबाकीच्या रकमेचा आकडा सातत्याने वाढताना दिसतो आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता निर्माण झाल्याने राज्यभर थकबाकीदारांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकी अधिक असलेल्या भागात पुरेशा प्रमाणात वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. त्यामुळे पुणे विभागातही शंभर रुपये थकबाकीसाठीही वीजतोड!

थकबाकीदारांवर सध्या वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगवान करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली असून, मोहिमेवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पुणे विभागातील ‘शून्य थकबाकी’च्या विशेष मोहिमेत २१ फेब्रुवारीपर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील २९ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या ६० हजार २४१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा ४५ हजार ६९३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा १८ कोटी ९० लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील १४ हजार ५४८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा १० कोटी ५६ लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २४ आणि २५ फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सुटीच्या दिवशीही वीजतोड सुरूच राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुटीच्या दिवशीही सुरूच ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही पथके थकबाकीदारांकडे कारवाईसाठी पोहोचणार आहेत. या कारवाईचे पर्यवेक्षण करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिका?ऱ्यांचे विशेष पथक शनिवारी आणि रविवारी पुणे परिमंडलात विविध ठिकाणी भेट देणार असून, थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविणार आहेत.