scorecardresearch

पुणे रेल्वे स्थानकात वर्षांला होणार बावीस लाख रुपयांची वीजबचत!

पारंपरिक ऊर्जेच्या स्रोताला पर्याय म्हणून नवीन व नवीकरणीय वीजस्रोताकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

पुणे रेल्वे स्थानकात वर्षांला होणार बावीस लाख रुपयांची वीजबचत!
ठाणे महापालिकेने आपल्या सर्व शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे

विजेची वाढती गरज व त्यातून निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेता पारंपरिक ऊर्जेच्या स्रोताला पर्याय म्हणून नवीन व नवीकरणीय वीजस्रोताकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हीच आवश्यकता ओळखून रेल्वे प्रशासनाने व परसिस्टंट फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकले असून, पुणे रेल्वे स्थानकाच्या विजेची गरज सौर ऊर्जेतून भागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काळात स्थानकात सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असून, त्यासाठीचा खर्च परसिस्टंट फाउंडेशन करणार आहे. या योजनेतून स्थानकामध्ये वर्षांला तब्बल २२ लाख रुपयांची वीजबचत शक्य होणार आहे.
पारंपरिक ऊर्जा निर्मितीला मागील काही वर्षांपासून अनेक मर्यादा आल्या आहेत. कोळशाचे घटते प्रमाण व त्यापासून वीजनिर्मिती होत असताना होणारे प्रदूषण त्याचप्रमाणे पाण्याची टंचाई आदी सर्व बाबींमुळे पर्यायी विजेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामध्ये पुणे रेल्वेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जेचा मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या अंतर्गत परसिस्टंट फाउंडेशनने या प्रकल्पासाठी पुढाकार घेत सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याची जबाबदारी घेतली आहे. फाउंडेशनकडून या प्रकल्पाचा खर्च करण्याबरोबरच त्याची दुरुस्ती व देखभालही फाउंडेशनकडूनच करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या करारावर रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, मििलद देऊस्कर यांच्या उपस्थितीत नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. परसिस्टंट फाउंडेशनच्या सोनाली देशपांडे व रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक गौरव झा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये पुणे स्थानकातील आरक्षण केंद्राच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे सहाशे पॅनल बसविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून १५० किलोवॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास पुणे स्थानकाला वर्षांला दोन लाख २० हजार युनिट वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे स्थानकात वर्षांला तब्बल २२ लाख रुपये विजेची बचत होऊ शकणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या