पुणे : शहराची हवा अल्हाददायक असल्याने ‘निवृत्तांचे शहर’ अशी ख्याती असलेल्या पुण्याची हवा प्रदूषित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील हवा आणि प्रदूषणात वाढ झाल्याने ‘खराब’ दिवसांची संख्या जास्त झाली आहे. गेल्या वर्षभरात शहरातील रस्त्यांवर तब्बल तीन लाख वाहने वाढली आहेत. यामुळे प्रदूषणात आणखी भर पडली आहे. प्रदूषित वातावरणामुळे ‘चांगल्या’ दिवसांची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. सौरऊर्जेच्या वापरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट वाढ झाली आहे, ही दिलासा देणारी बाब आढळून आली आहे.
पुणे महापालिकेने चालू वर्षासाठीचा (२०२४-२५) पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये शहरातील हवामान, पाणी गुणवत्ता, ऊर्जा वापर, जैवविविधता आणि आरोग्य अशा विविध घटकांचा अभ्यास करून वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. त्यामध्ये २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ वर्षामध्ये हवेचे प्रदूषण वाढले असल्याने चांगल्या दिवसांची संख्या कमी झाली असून खराब दिवस वाढले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्यावरण सद्य:स्थिती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्यासह महापालिकेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी हा अहवाल सादर केला.
तीन दिवस ‘खराब’
शहरातील हवेची गुणवत्ता खराब झाली असून वर्षातील चांगल्या दिवसांची संख्या कमी होत चालली आहे. २०२३-२४ या वर्षात ३६५ दिवसांपैकी नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले चांगले दिवस ७९, समाधानकारक दिवस १४५, मध्यम दिवस १४० तर खराब दिवस केवळ एक होता. मात्र २०२४-२५ या वर्षात चांगले दिवस ५२, समाधानकारक दिवस १३७, मध्यम दिवस १७४ तर खराब दिवसांची संख्या तीन झाली असल्याचे पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
४१ लाख २५ हजार वाहने
शहरातील वाहनांची संख्या तीन लाखांनी वाढली आहे. २०२३-२४ या वर्षात शहरात असलेल्या एकूण वाहनांची संख्या ३८ लाख ६३ हजार ८४९ इतकी होती. मात्र जुलै २०२५ पर्यंत ही संख्या ४१ लाख २५ हजार ९६८ झाली आहे. इलेक्ट्रीक, सीएनजी तसेच हायब्रीड वाहनांच्या वापरात वाढ होत असली तरी सर्वात अधिक वाहने पेट्रोलची असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत देखील मोठी वाढ झाल्याचे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २०२३-२४ या वर्षी ३३७७ डेंग्यूचे रुग्ण होते. त्यामध्ये २०२४-२५ मध्ये वाढ होऊन ४९५८ रुग्णसंख्या झाली
५७ लाख ८१ हजार वृक्ष
पुणे शहरातील उद्यानांच्या संख्य़ेत एका वर्षात १३ ने वाढ झाली आहे. महापालिकेकडे २०२३- २४ या वर्षात २११ उद्याने होती. त्यावेळी वृक्षांची संख्या ५५ लाख ८१ हजार ५७८ होती. २०२४ -२५ या वर्षात शहरात उद्यानांची संख्या २२४ वर गेली असून यामध्ये वृक्षांची संख्या ५७ लाख ८१ हजार ५७८ आहे.
पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरुसुंगी ही दोन गावे वगळली आहेत. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ ५१९ चौरस किलोमीटरवरून ४८० चौरस किलोमीटर झाले आहे. वर्षभरात महापालिकेचे क्षेत्रफळ कमी झाले असतानाही शहरात दोन लाख झाडे वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्ष्यांच्या नोंदी
पुणे शहरात २०२३ – २४ या वर्षात वेताळ टेकडी येथे २५३, कवडीपाठ येथे २६३, पाषाण येथे २३६ पक्ष्यांची नोंद झाली होती. २०२४- २५ या वर्षात यामध्येही वाढ झाली आहे. यामध्ये वेताळ टेकडी येथे २७५, कवडीपाठ येथे २६४, तर पाषाण येथे २४० पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत पक्ष्यांची संख्या वाढली आहे.
कार्बन उत्सर्जनात वाढ
शहरातील वार्षिक कार्बन उत्सर्जन सद्य:स्थितीला एक कोटी २ लाख टनांच्या पुढे अर्थात प्रति व्यक्ती २.४७ टनांपर्यंत पोहोचले आहे. ही आकडेवारी २०२१-२२ ची असून आता त्यामध्ये वाहनांची वाढणारी संख्या आणि प्रदूषण यामुळे अधिकच भर पडत आहे. २०११- १२ च्या नोंदीनुसार वार्षिक कार्बन उत्सर्जनाचे हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.४६ टनांपर्यंत होते. शहरातील नद्या तसेच तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येत असून शहरातील पाषाण, जांभूळवाडी आणि कात्रज तलावात जाणारे मैलापाणी रोखण्यासाठी कामे करण्यात आली आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१० लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया
शहरात दररोज सुमारे २३००-२४०० टन कचरा निर्माण होतो, त्यापैकी १३५०-१४०० टन सुका व ९५०-१००० टन ओला कचरा असतो. १३ प्रकल्पांमधून १४४० टन सुका आणि ६ प्रकल्पांतून ११०५ टन ओला कचरा प्रक्रिया केला जातो. बायोमायनिंगद्वारे २८.५ एकर जागा मोकळी करण्यात आली. चालू वर्षात बायोमायनिंगच्या माध्यमातून १० लाख टन प्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे शहराचा पर्यावरणाचा सद्य:स्थिती अहवाल मुख्य सभेसमोर सादर करण्यात आला. यामध्ये विविध घटकांचा अभ्यास करून माहिती देण्यात आली आहे. शहरातील प्रदूषण कमी करून, कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. हरित उपाययोजनांच्या बाबतीत पुढील दोन वर्षांत पुण्यामध्ये अनेक मोठ्या सुधारणा दिसून येतील. – नवल किशोर राम, आयुक्त महापालिका
अहवालात दुरुस्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश
महापालिकेचा पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल मंजुरीसाठी आल्यानंतर त्यामध्ये दिलेली माहिती आणि वस्तुस्थिती याबाबत शंका आल्यास त्याची सविस्तर माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी समजून घेतली. संबंधित विभागाच्या प्रमुखांना प्रश्न विचारत आयुक्तांनी त्यांची शाळा घेतली. काही विभागांनी दिलेल्या माहितीमध्ये चुकीची आकडेवारी असल्याचे लक्षात येताच त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून त्यानंतरच हा अहवाल अंतिम करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मागील काही वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर सादर करण्यात आलेले पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल अवघ्या दोन मिनिटांत सादर करून त्याला मंजुरी दिली जात होती. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले. पाऊण तास यावर चर्चा झाली. आयुक्त हे खूपच लक्ष घालत असल्याची चर्चा महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये होती.