पुणे प्रतिनिधी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघाची बैठक आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकी बाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकसभेत अमोल कोल्हे यांचं काम चांगलं असून त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार संघातील विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्यातील प्रामुख्याने वाहतूक कोंडी आणि बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारे चर्चा असून आज झालेल्या बैठकीत अमोल कोल्हे यांच्या नावाला सर्वांनी मजबुतीने पाठिंबा दिला आहे. पण आमचा पक्ष इतर (ठाकरे गट शिवसेना आणि काँग्रेस) दोन पक्षांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेईल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.



