पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे साहजिकच या परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थ्यांमध्ये त्यांबाबतचे दडपण अर्थात ‘एक्झाम अँक्झायटी’ दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय शांतपणे परीक्षा देता यावी, या हेतूने ही ‘एक्झाम अँक्झायटी’ दूर करण्यासाठी आता राज्यातील मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने पुढाकार घेतला आहे. सुमारे ३५० मानसोपचारतज्ज्ञ राज्यभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेध लागले आहेत. परीक्षांचे बदललेले स्वरूप, तीव्र स्पर्धा आणि चांगले गुण मिळाले तर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार अशी भीतीची टांगती तलवार, या आणि अशा अनेक कारणांमुळे पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत. स्वत:च्या आणि शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझेही विद्यार्थ्यांवर आहेच. त्याचा परिणाम म्हणून परीक्षेपूर्वी मानसिक आणि शारीरिक लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. केलेला अभ्यास आठवणार नाही, लिहिता येणार नाही, वेळ पुरणार नाही अशी भीती ही मानसिक, तर भीती, धडधडणे, उलट्या-जुलाब अशी शारीरिक लक्षणे ही परीक्षेच्या दडपणाचा भाग असतात.

हेही वाचा >>> “ते गेले बिचारे, जाऊ द्या” भगतसिंह कोश्यारींच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचे हात जोडत मिश्किल वक्तव्य, म्हणाले…

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार म्हणाले,की पूर्वी केवळ हुशार मुलेच अशा तक्रारींसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे येत. करोनानंतर चित्र बदलले आहे. ऑनलाइन शाळा, अभ्यास, लिखाणाची सवय नसल्यामुळे मंदावलेला वेग अशा अनेक कारणांमुळे सर्व स्तरातील मुलांमध्ये परीक्षेचे दडपण आहे. यंदा इंडियन सायकिॲट्रिक सोसायटीच्या पश्चिम विभागातर्फे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील मानसोपचारतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये अभ्यासाचे तंत्र, वाचलेले लक्षात राहण्यासाठी क्लृप्त्या, एकाग्रता टिकवण्यासाठी ध्यान (मेडिटेशन) असे उपाय यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत आहोत. पुढील वर्षीपासून नववी आणि अकरावीच्या वर्षीच या उपक्रमाची सुरुवात केली असता त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विचारही डॉ. कासार यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा >>> राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात २४ तासांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. ऋचा श्रीखंडे म्हणाल्या, की आपण उत्तीर्ण होणार नाही, अनुत्तीर्ण झालो तर कुटुंबीय, मित्रमैत्रिणी काय म्हणतील, मला किमान ८५-९० टक्के गुण मिळवायलाच हवेत, असे अनेक विचार विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्यातून परीक्षा जवळ आली की दडपण वाढू लागते. मन एकाग्र न होणे, वाचलेले लक्षात न राहणे अशा अनेक गोष्टी या दडपणामुळे होतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेशी शांतता मिळणे, परीक्षेच्या काळात जागरणे न करणे, चांगला आहार, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, असेही डॉ. श्रीखंडे यांनी स्पष्ट केले.