पुणे : पक्षाघात (स्ट्रोक) हा जगभरात मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण ठरत आहे. परंतु, पक्षाघात झाल्यानंतर रुग्णाला योग्य वेळी योग्य रुग्णालयात पोहोचवले, तर त्याचे प्राण आणि मेंदूची कार्यक्षमता दोन्ही वाचवता येतात. रुग्णाला वेळेत ‘स्ट्रोक-रेडी’ रुग्णालयामध्ये पोहोचवणे हाच पक्षाघातावरील सर्वांत प्रभावी प्रथमोपचार आहे, असा सल्ला मेंदूविकारतज्ज्ञांनी दिला आहे.
दर वर्षी २९ ऑक्टोबर हा जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘प्रत्येक क्षण महत्त्वाचा’ ही आहे. या निमित्ताने मेंदूविकारतज्ज्ञांनी वेळेचे महत्त्व आणि तत्काळ उपचारांचे फायदे अधोरेखित केले आहेत. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले, की पक्षाघाताच्या उपचारांत वेळ हेच सर्वांत महत्त्वाचे औषध आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने मेंदूतील पेशींना ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी, त्या पेशी दर मिनिटाला मृत होऊ लागतात.
प्रत्येक मिनिटाला असंख्य मेंदू पेशी नष्ट होतात. मृत पेशींच्या भागातील मेंदूचे कार्य कायमचे कमी होते. म्हणूनच, लक्षणे दिसताच कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी रुग्णाला तातडीने ‘स्ट्रोक-रेडी’ म्हणजेच पक्षाघातावरील उपचारांची योग्य व्यवस्था असलेल्या रुग्णालयामध्ये घेऊन जाणे, हेच सर्वांत प्रभावी पाऊल आहे. ‘स्ट्रोक-रेडी’ रुग्णालयात आपत्कालीन उपचारांच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णाच्या मेंदूतील अडथळा काही मिनिटांत ओळखून थ्रॉम्बोलायसिस किंवा इतर आवश्यक उपचार त्वरित सुरू करता येतात. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचे अपंगत्व मोठ्या प्रमाणात टाळता येते.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राकेश रंजन म्हणाले, की पक्षाघाताविषयी जागरूकता आणि वेळेत उपचार घेणे खूप गरजेचे आहे. मेंदूच्या आरोग्याकडे ३०व्या वर्षांपासूनच लक्ष द्यायला हवे. या वयात ताण, कामाचे दीर्घ तास, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि झोपेचा त्रास या गोष्टी मेंदूवर परिणाम करू लागतात. स्मृती कमी होणे, उच्च रक्तदाब आणि मेंदूशी संबंधित इतर आजारांची सुरुवात याच काळात होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आणि पौष्टिक आहार, रोजचा व्यायाम, ताण कमी ठेवणे, वाचन किंवा नवीन गोष्टी शिकून मन सक्रिय ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे या साध्या सवयींनी मेंदू दीर्घ काळ निरोगी ठेवता येतो.
‘स्ट्रोक-रेडी’ रुग्णालय म्हणजे काय?
– सीटी स्कॅनची तत्काळ सुविधा
– मेंदूविकारतज्ज्ञांची उपलब्धता
– २४x७ आपत्कालीन सेवा
