सासवडमध्ये होणाऱया ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बुधवारी ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘आई’ या कवितेने घराघरांत पोहोचलेले कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे यांची निवड झाली. शिंदे यांना ४६२ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांना ३२५ मते मिळाली. शिंदे, गणोरकर यांच्यासह लेखक अरूण गोडबोले आणि संजय सोनवणी असे एकूण चार उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी शिंदे आणि गणोरकर या दोघांमध्येच मुख्य चुरस होती.
एक हजार ७० मतदारांना मतपत्रिका यापूर्वीच पाठविण्यात आल्या होत्या. मतपत्रिका महामंडळाकडे पाठविण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. एकूण ९१० मतपत्रिका महामंडळाच्या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची मतमोजणी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिंदे यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली.
निवड झाल्यानंतर शिंदे टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात आले. उपस्थितांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर त्यांच्या निवडीचे पत्र शिंदे यांच्याकडे देण्यात आले. हार घालून त्यांचा सत्कारही करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान आपण आपल्या आईला अर्पण करीत असल्याची भावनापूर्ण प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मी लेकरू आहे. त्यामुळे त्यांनाही हा सन्मान अर्पण करतो, असेही ते म्हणाले.