सायबर गुन्ह्यांची तक्रारदार देणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे. शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती असून तक्रारदारांना सायबर गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात जावे लागते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी तसेच एका अधिकाऱ्याला सायबर गुन्हे नोंदवून घेणे तसेच सायबर गुन्ह्यांचा तपासाबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहरात सायबर गुन्ह्यांच्या टक्का वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून चोरटे सामान्यांना गंडा घालतात. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, परदेशात नोकरीचे आमिष, संकेतस्थळावर गृहोपयोगी वस्तूंची विक्री अशी आमिषे दाखवून सामान्यांची फसवणूक केली जाते. सायबर फसवणूक झाल्यास तक्रारदारांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात जावे लागते. सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अर्जाची पडताळणी करून संबंधित गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन पोलीस ठाण्यांकडे तपासासाठी सोपविला जातो.

पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातात. सायबर गुन्हे दाखल करून घेण्याबाबत पोलीस ठाण्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सायबर गुन्हे दाखल करून घेण्यात चालढकल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. सायबर पोलीस ठाण्यात सायबर तक्रारींचे प्रमाण वाढते असून पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्याबाबत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाण्यात सायबर तक्रार कक्ष

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारातील सायबर पोलीस ठाण्यात दररोज साधारणपणे १०० तक्रारी दाखल होतात. तक्रारींच्या तुलनेत सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अपुरे आहे. सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते असून त्या तुलनेत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे. सायबर चोरटे परराज्यातून गुन्हे करतात. सायबर पोलीस ठाण्यावर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर तक्रार कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि पाच कर्मचारी राहणार आहेत. पोलीस ठाण्यात सायबर तक्रार कक्ष कार्यान्वित केल्यानंतर तक्रारदारांना शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. पोलीस ठाण्यांमधील कामकाजासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मंजुरीनंतर सायबर तक्रार कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सायबर गुन्ह्यांचा तपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमेल हॅक करणे तसेच इमेलचा गैरवापर, समाजमाध्यमातून प्रलोभन, बदनामी, अश्लील चित्रफीत, आर्थिक सायबर गुन्हे, मोबाइल, इलेक्ट्राॅनिक साहित्यातील विदा लांबविणे अशा गु्न्ह्यांचा तपास पोलीस ठाण्यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.