महिनाभरात ९७.१८ लाख क्विंटल साखर उत्पादन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यात १९५ साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी परवानगी मागितली असून, त्यापैकी १४१ कारखाने सुरू झाले आहेत. या माध्यमातून महिन्याभरात ११२.५२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप (नऊ टक्के) झाले असून, ९७.१८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. उर्वरित कारखान्यांकडून उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याने त्यांचे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

यंदा गाळप हंगाम दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला. गाळप हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी परवानगी मागितली. मात्र, ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी दिलेली नाही, अशा कारखान्यांना गाळप परवाने देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १०० टक्के एफआरपी दिलेल्या १४१ कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत, असे साखर आयुक्तालयाचे सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सांगितले.

गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांपैकी सोलापूर विभागात सर्वाधिक ३१ कारखान्यांचा समावेश असून दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर विभागात २९ कारखाने, तर पुणे विभागात २८ कारखान्यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षांत राज्यात १०९३ लाख टन इतके ऊस गाळप अपेक्षित असून ११० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होण्याचा अपेक्षित असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

दरम्यान, गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून ऊस गाळपाचे प्रमाण घटले आहे. विशेषत: सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचे गाळप घेण्यास सुरुवात केली आहे, त्या कारखान्यांमध्ये उद्दिष्टाप्रमाणे गाळप होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

व्याजासह एफआरपी वसुली

दिवाळीपर्यंत ज्या कारखान्यांनी थकीत एफआरपी दिलेली नाही, त्या कारखान्यांकडून व्याजासह एफआरपी रक्कम वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्त गायकवाड यांनी दिला होता. त्यानुसार संबंधित कारखान्यांकडून व्याजासह एफआरपी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Factories state sugarcane crushed ysh
First published on: 23-11-2021 at 00:21 IST