लष्करात स्वयंपाकी (कूक) होण्याच्या परीक्षेत एकाने तोतया उमेदवारास परीक्षेस बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.दीपू कुमार (वय २३, रा. भारसर, फुलहत्ता, जि. सीतामढी, बिहार), शैलेंद्र सिंग (वय २४, रा. धोनाई, जि. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत राहुल महेंद्रसिंग राठी (वय ४२, रा. धानोरी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कराच्या ग्रेफ सेंटर या संस्थेकडून सीमावर्ती भागात रस्ते बांधणीचे काम केले जाते. या संस्थेचे कार्यालय आळंदी रस्त्यावर कळस परिसरात आहे. या संस्थेत स्वयंपाकी भरती होणार होती. भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा >>>पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानंतर जुन्या महामार्गावरही टोलचा भुर्दंड; प्रवास आणखी महागणार
शैलेंद्र सिंग याने त्याच्या ऐवजी दीपू कुमारला तोतया (डमी) उमेदवार म्हणून बसवले. पर्यवेक्षक राहुल राठी यांना संशय आल्याने त्यांनी दीपू कुमारची चौकशी केली. तेव्हा शैलेंद्र सिंगने दीपू कुमार तोतया उमेदवार म्हणून परीक्षेस बसविल्याचे उघडकीस आले.मूळ परीक्षार्थी उमेदवार सिंग बाहेर थांबल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पर्यवेक्षक राठी यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शैलेंद्र सिंग, दीपू कुमार यांना अटक केली दोघांची चौकशी करण्यात येत आहे. सिंग याची कुमार याच्याशी ओळख झाली होती. त्याने कुमारला तोतया उमेदवार म्हणून परीक्षा देण्यास सांगितले होते, असे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितले.