पुणे : विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय होऊन नऊ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचा दावा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला. तर, आरोपांमध्ये तथ्य नसून काही अपवाद वगळता प्रत्येक पीडित कुटुंबाला मदत मिळत असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
‘विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय ‘महावितरण’च्या संचालक मंडळाने ९ मार्च २०१६ ला जाहीर केला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. नुकसानभरपाई देण्यात महावितरणमध्येच एकवाक्यता नसल्याने प्रत्येक विभागात प्रकरणाचे गांभीर्य पाहून भरपाई दिली जाते,’ असा आरोप वेलणकर यांनी केला.
ते म्हणाले, ‘सध्या राज्यात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महावितरणची सदोष वीज यंत्रणा आणि सुरक्षेची पुरेशी उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांची कधीही भरून न येणारी हानी होते. त्यामुळे त्यांना आधार मिळावा म्हणून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने किमान नुकसानभरपाई मिळणे आवश्यक असते. मात्र, पीडित कुटुंबे नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत.’
याबाबत महावितरणच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे म्हणाले, ‘विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला महावितरणकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. ही भरपाई मिळावी म्हणून आढावाही घेण्यात येतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींच्या वारसांकडून कागदपत्रांची पूर्तता केली गेली नसल्यास भरपाई देण्यास विलंब होतो. तसेच, विद्युत निरीक्षकांकडून अशा प्रकारच्या अपघातांची प्राथमिक तपासणी केली जाते. त्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यास नुकसानभरपाई देता येत नाही.’
महावितरणने २०१६चे परिपत्रक राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने लावावे आणि विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना या परिपत्रकाप्रमाणे विनाविलंब नुकसानभरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत.- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला महावितरणकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. ही भरपाई मिळावी म्हणून आढावाही घेण्यात येतो. काही प्रकरणांत मृत व्यक्तींच्या वारसांकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यास भरपाईस विलंब होतो.- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे विभाग