पुणे : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत झालेल्या बैठकीनंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरपाईबाबत भरणे म्हणाले, की मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणची माहिती अद्याप मिळालेली नाही. माहिती संकलित करून केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. केंद्राला प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. कृषी, महसूल विभागाकडून कर्मचारी माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
एनडीआरएफच्या निकषांनुसार पहिल्या टप्प्यात मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही जास्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. वाढीव निधी राज्य शासनाकडून दिला जाणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले आहे. शेतकरी अडचणीत आहे. शिवाय पालकमंत्रीही त्यांच्या भागात फिरत आहेत. त्यांच्याकडून अहवाल घेतला जात आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहील, असेही भरणे यांनी सांगितले.
पंचनामा करायचा राहिल्यास अधिकारी जबाबदार
पंचनाम्यांतील अडचणींबाबत विचारले असता भरणे म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असताना अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कोणी पंचनामा करण्यापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल.’
पंढरपूर तालुक्यातील दोन मंडळे नुकसानग्रस्त सर्वेक्षणापासून वंचित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव, भाळवणी या दोन मंडळांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे केळी, ज्वारी, ऊस, डाळिंब अशा शेतीसह घरे, शेती उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या चुकीच्या आकडेवारीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईतून शेतकरी वंचित राहात असल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या पंढपूर तालुक्यातील भंडीशेगाव, भाळवणी या दोन मंडळांचा नुकसानग्रस्त सर्वेक्षणात समावेश करण्याची मागणी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.