हॉटेलमध्ये रांग लावून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणारे खवय्ये पुणेकर टाळेबंदीमुळे घरातच आहेत. मात्र, या टाळेबंदीच्या कालावधीत पुणेकरांचा पिझ्झा, बर्गर आदी फास्टफूड पदार्थ आणि शाकाहारी खाद्यपदार्थावर भर असल्याचे दिसून येत आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हॉटेल्स बंद करण्यात आली. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी खाद्य पदार्थ घरपोच देण्यास शासनाने मान्यता दिली. त्यामुळे घरपोच खाद्य पदार्थ देणाऱ्या स्वीगी, झोमॅटो अशा ऑनलाइन अ‍ॅपची सेवा सुरू झाली. या अ‍ॅपच्या माध्यमातून काही हॉटेल्स आपली सेवा देत आहेत.

पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे सचिव किशोर सरपोतदार म्हणाले, की सध्या बर्गर, पिझ्झा, चायनीज पदार्थाना जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यातही डॉमिनोज, मॅकडोनाल्ड अशा बहुराष्ट्रीय साखळी रेस्टॉरंट्समधून खाद्यपदार्थ मागवण्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात संघटनेशी संलग्न सुमारे ८५० हॉटेल्स आहेत. त्यातील के वळ पाच ते दहा टक्के च हॉटेल्समधून सेवा दिली सध्या सुरू आहेत. टाळेबंदीमुळे अनेक हॉटेलमधील कर्मचारी आपल्या गावी गेले आहेत.

सर्व नियमांचे पालन करून सेवा देणे शक्य

झोमॅटो, स्वीगी अशा ऑनलाइन पुरवठा यंत्रणा सध्या हॉटेलमधील खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र, या यंत्रणांवर सध्या ताण आला आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी काही हॉटेल व्यावसायिक स्वत: घरपोच सेवा देण्यास तयार आहेत. मात्र, त्यांना पोलिसांकडून परवाना मिळण्यात अडचणी आहेत. पोलिसांनी हॉटेल चालकांना परवाना दिल्यास सर्व नियमांचे पालन करून सेवा देणे शक्य होईल, असे काही हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण हॉटेल्सपैकी ५ ते १० टक्के  हॉटेल्सच सुरू आहेत. त्यात मांसाहारी पदार्थापेक्षा शाकाहारी पदार्थाना जास्त मागणी आहे. सध्या अन्नधान्य, भाजीपाला उपलब्धतेत अडचणी आहेत. त्यामुळे आधी ज्यांनी हॉटेल सुरू केली होती, तेही आता बंद करू लागले आहेत.

– गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशन