पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र, दीर सुशील यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. दोघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. वैष्णवीला विवाहात देण्यात आलेले ५१ तोळे सोन्याचे दागिने बँकेकडे गहाण ठेवण्यात आले आहे. तिला सासरा आणि दिराने वेळोवेळी मारहाण केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तपासासाठी दोघांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एच. बारी यांनी शुक्रवारी दिला.

वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, ता. मुळशी) आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशी तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७) आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे (वय २७ रा. भुकूम, ता. मुळशी) यांना शुक्रवारी बावधन पोलिसांनी अटक केली. याबाबत वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१ रा. वाकड) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘आरोपींनी केलेला गुन्हा हा महिला अत्याचाराचा आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. शवविच्छेदनात वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असून, शरीरावर दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. रासायनिक विश्लेषण करण्यात येणार आहे. मृतदेहावरील जखमा पाहता वैष्णवीला वेगवेगळ्या शस्त्रांनी मारहाण केल्याचे दिसून येत आहे. त्यांपैकी एक प्लॅस्टिकचा पाइप पती शशांक याने दिलेल्या माहितीवरून जप्त करण्यात आला आहे. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांनीही तिला मारहाण केली आहे. ‘राजेंद्र याच्या कार्यालयात करण्यात आलेल्या सजावटीचे पैसे देण्यासाठी कस्पटे यांना भाग पाडले आहे,’ असे सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवादात सांगितले. या प्रकरणात फिर्यादी कस्पटे यांच्याकडून ॲड. शिवम निंबाळकर यांच्याकडून बाजू मांडण्यात आली.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती ॲड. कदम आणि ॲड. निंबाळकर यांनी युक्तिवादात केली.

दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न

वैष्णवी हगवणेने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या वेळी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी खासगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्रे मिळवली आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास

  • घटनास्थळावरून पहार, साडी आणि स्टूल जप्त
  • वैष्णवीची सासू, नणंद, पती अटकेत
  • १२ साक्षीदारांच्या जबाबाची नोंद
  • व्हिसेरा राखून ठेवला, रासायनिक विश्लेषण
  • ५१ तोळे दागिने बँकेकडे गहाण, बँकेशी पत्रव्यवहार
  • मारहाणीत वापरलेला पाइप, दुचाकी जप्त

पोलिसांचा ‘चकवा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा सुशील यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने हजर करण्यात आले. प्रवेशद्वाराबाहेर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. आंदाेलनस्थळी जमलेली गर्दी, तसेच घोषणाबाजी विचारात घेऊन पोलिसांनी मागील बाजूच्या प्रवेशद्वारातून आरोपींना हजर केले. सुनावणीवेळी वकिलांची गर्दी झाली होती. वकील, तसेच प्रसारमाध्यमांना चकवा देण्यात आला. आरोपींना दुसऱ्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी संपल्यानंतर बंदोबस्तात हगवणेंना न्यायालयातून बाहेर नेण्यात आले.