पुण्यात भरदिवसा एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी अनेकांनी बघ्याची भूमिका घेतलेली असताना लेशपाल जवळगे या तरुणाने हल्लेखोराला रोखत तरुणीचा जीव वाचवला. यानंतर त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच आता लेशपालचे वडील चांगदेव जवळगे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मुलाने त्या तरूणीचा जीव वाचवला याचा अभिमान वाटतो, मात्र मनात त्याला काही व्हायला नको अशी धाकधुकही असल्याची भावना व्यक्त केली. ते आढेगावमध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

चांगदेव जवळगे म्हणाले, “लेशपालने जे कर्तव्य पार पाडलं ते चांगलं केलं असं वाटतं. मला त्याचा अभिमान वाटतो. खेडेगावातील माणसानं असं कर्तुत्व करणं महत्त्वाचं आहे.”

“लेशपालच्या बहिणीने फोन करून सांगितलं तेव्हा हा प्रकार समजला”

हा प्रकार तुम्हाला कधी कळला या प्रश्नावर लेशपालचे वडील म्हणाले, “त्याच्या बहिणीने सांगितलं. तिचा फोन आला आणि तिने तुम्हाला काही समजलं का असं विचारलं. त्यावर मी मला काही कळालं नाही, आमची शेतातील कामंच सुरू आहेत असं सांगितलं. त्यावर तिने लेशपालने (बापू) मुलीचा प्राण वाचवला असं सांगितलं.”

“नाहीतर अशा घटना घडत असतील तर आपल्या घरी निघून या”

“दर्शना पवारचं प्रकरण झाल्यामुळे मी लेशपालला आदल्या दिवशीच फोन केला होता. मी म्हटलं होतं की, तुम्ही दोघं बहिण-भावंडं तिथं आहात. नीट वागा, नाहीतर अशा घटना घडत असतील तर आपल्या घरी निघून या. त्यामुळे मुलीने या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला तेव्हा मला तसंच वाटलं. तेव्हा मुलीने सांगितलं की, तसं काही नाही. मुलगा मुलीच्या मागे कोयता घेऊन पळत चालला होता. त्यावेळी लेशपाल अभ्यासासाठी ग्रंथालयात चालला होता. त्याच्यासमोर ही घटना घडली त्यामुळे त्याने कोयता धरला आणि मुलीचा प्राण वाचवला,” अशी माहिती चांगदेव जवळगे यांनी दिली.

“मनात धाकधूक वाटते, डोक्यात अनेक प्रश्न येतात”

ते पुढे म्हणाले, “यानंतर मग मी बरं बरं, त्याने चांगलं काम केलं असं म्हटलं. आता मनात धाकधूक वाटते. डोक्यात अनेक प्रश्न येतात. एका दुकानदाराने शटर ओढलं होतं. त्यांना अपमान वाटला असेल तर काय. आपल्याला अभ्यास करायचा आहे, तिथं रहायचं आहे. त्यामुळे त्यांनी काही वैर ठेऊ नये. असं काही मनात आणू नये, पण शेवटी मनात येतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तिकडे पुण्यात कोयते गँगच्या अनेक घटना”

“तिकडे पुण्यात कोयते गँगच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे त्याला काही झालं, तर आपला एकुलता एक मुलगा आहे, आपण त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय, तर असं वेगळं काही घडू नये असं वाटतं. मुलीचा प्राण वाचवला हे चांगलं काम केलं आहे. त्याचा अभिमान वाटतो,” असंही लेशपालच्या वडिलांनी नमूद केलं.