लहान अन्न व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाचे परवाने घ्यावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून शहरात गेल्या दहा दिवसांत तब्बल ५९०० अन्न व्यावसायिकांनी एफडीएची नोंदणी किंवा परवाने घेतले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश भाजी किंवा फळे विक्रेते आहेत. नोंदणी किंवा परवाना घेण्याची अंतिम मुदत ४ फेब्रुवारी असून त्यानंतर अन्न व्यावसायिकांवर न्यायालयीन कारवाई होऊ शकणार आहे.
अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या दहा दिवसांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे मिळून १४,३०० अन्न व्यावसायिकांनी नोंदणी व परवाने घेतले आहेत. नवीन कायद्यानुसार भाजी आणि फळांसारख्या प्रक्रिया न केलेल्या अन्नपदार्थाच्या विक्रीसाठीही नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत भाजी व फळे विक्रेत्यांना या गोष्टीची माहिती नव्हती. एफडीएने नोंदणी आणि परवान्यांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर लहान अन्न व्यावसायिकांच्या संघटना स्वत:हून एफडीएला त्यांच्या सभासदांसाठी नोंदणी कँप आयोजित करण्याची विनंती करत आहेत. एफडीएचे कर्मचारी त्या-त्या ठिकाणी जाऊन विक्रेत्यांकडून जागेवर फॉर्म व शुल्क स्वीकारत असल्यामुळे प्रक्रिया सोपी झाली आहे.’’
‘अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६’ नुसार शेतकरी आणि मच्छीमार यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व अन्न व्यावसायिकांनी एफडीएचा परवाना किंवा नोंदणी घ्यावी असा नियम आहे. यात वार्षिक उलाढाल १२ लाखापेक्षा कमी असल्यास संबंधित विक्रेत्याला नोंदणी करावी लागते. तर, १२ लाखाहून अधिक वार्षिक उलाढालीसाठी परवाना घ्यावा लागतो.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
भाजी आणि फळे विक्रेतेही एफडीएचे परवाने घेण्यात पुढे
नोंदणी किंवा परवाना घेण्याची अंतिम मुदत ४ फेब्रुवारी असून त्यानंतर अन्न व्यावसायिकांवर न्यायालयीन कारवाई होऊ शकणार आहे.
First published on: 24-01-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fda license vegetable fruits salesman