रस्त्यांवर किंवा प्रमुख चौकांमध्ये उभे राहून वाहतूक नियमनाचे करावे लागणारे काम, कामाची वेळ आठ तासांपेक्षा जास्त, महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्याने कर्तव्य बजावत असताना होणारी कुचंबणा, अपुरे मनुष्यबळ, पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत शहरातील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. गेली अनेक वर्षे जाणवत असलेल्या अशा अनेक समस्यांचा पाढा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी वाचला.
चहुबाजूने विस्तारणाऱ्या पुण्यात महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातून नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने अनेक नागरिक येत असतात. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पोलिसांची कुमक कमी पडत असून वाहतूक शाखेची वेगळी परिस्थिती नाही. वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांना देखील नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागते. गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ यांसारख्या मोठय़ा प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सणांच्या निमित्ताने आणि नेहमीच्या कामाचा भाग म्हणून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी चौका-चौकात, रस्त्यांवर थांबावे लागते. अशावेळी स्वच्छतागृहाचा वापर करायचा असल्यास कर्तव्य असलेल्या ठिकाणी आजुबाजूला महिला स्वच्छतागृह असतेच असे नाही, त्याचा सर्वाधिक त्रास महिला पोलीस कर्मचाऱ्यांना होतो.
पुण्यात वाहतूक शाखेचे अठ्ठावीस विभाग असून त्यातील एकही विभाग सर्वसुविधांनी युक्त नाही. वाहतूक शाखेचे कार्यालय म्हणजे पत्र्याचे शेड हे समीकरण वर्षांनुवर्षे कामय आहे. कार्यालयांत वाहतूक पोलिस विभागातील महिला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र स्वच्छतागृहे, आठ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य असताना आराम करण्यासाठी आणि पोशाख बदलण्यासाठी जागा या सोयी नाहीत. चौकात, रस्त्यांवर कर्तव्य बजावत असताना महिला कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून चांगली वागणूक मिळतेच असे नाही. हुज्जत घालणे, अंगावर वाहन नेणे असे प्रकार सर्रासपणे होतात.
महिला पोलीस वाहतूक कर्मचाऱ्यांची सकाळी आठ वाजता सुरू झालेली डय़ुटी रात्री नऊ वाजेपर्यंत असते. त्यांनतर संबंधिक विभागात हजेरी होऊन त्या घरी जाण्यासाठी मार्गस्थ होतात. अशा व्यस्त वेळापत्रकामुळे महिला कर्मचाऱ्यांना घर-कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. सण, उत्सवांमध्ये तर अत्यंत बिकट परिस्थिती असते. हॉटेल वा मोठय़ा दुकानांना स्वच्छतागृहे वापरण्यास द्यावीत, याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत का, वृत्तपत्रांमधून त्याबाबत आवाहन करण्यात आले आहे का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. नेमणूक असलेल्या परिसरातील खासगी आस्थापनांमधील स्वच्छतागृहे वापरण्यास महिला कर्मचारी कचरतात ही वस्तुस्थिती आहे. तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या असंवेदनशील वागणुकीमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्यावर परिणाम होतो.
नीला उदासीन, निवृत्त वाहतूक पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या नक्कीच आहेत. महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती असलेल्या ठिकाणापासून पोलीस ठाणे वा चौकी जवळ असल्यास काही प्रश्न येत नाही. तसेच नियुक्ती असलेल्या ठिकाणापासून जवळपास स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यास आजुबाजूच्या परिसरातील मोठी दुकाने, हॉटेल व्यावसायिकांना गणवेशातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला स्वच्छतागृहे उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
कल्पना बारावकर, वाहतूक पोलीस उपायुक्त