पुणे : मोटार पुढे नेण्याच्या वादातून मारामारी झाल्याची घटना कोेरेगाव पार्क भागातील एका तारांकित हाॅटेलसमोर घडली. या प्रकरणी पोलिसांकडून दोन मोटारचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरेगाव पार्क भागातील एका तारांकित हाॅटेलसमोर रविवारी दुपारी मोटार पुढे नेण्यावरून मोटारचालकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. मुंढवा पोलिसांंकडून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरीविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी आचल हरिनखेडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भर रस्त्यात हाणामारी झाल्यानंतर कोरेगाव ते मुंढवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, तसेच या भागात गस्त घालणारे गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोन्ही मोटारचालकांसह चौघांना ताब्यात घेतले. सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.