पुणे : उन्हामुळे द्राक्षांची गोडी वाढली असून आंबट गोड रसाळ द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. द्राक्षांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले असून पुढील महिनाभर द्राक्षांची गोडी चाखता येणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो द्राक्षांची प्रतवारीनुसार ५० ते १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

उन्हाचा तडाखा वाढल्याने द्राक्षांची गोडी वाढली असून प्रतवारीही चांगली आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या दररोज ५० टन द्राक्षांची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सांगली, सोलापूर भागातून द्राक्षे बाजारात विक्रीस पाठविली जात आहेत. मागणीच्या तुलनेत द्राक्षांची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असून दरही सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत, असे मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात द्राक्षांची आवक सुरू होते. १५ एप्रिलपर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू असतो. बाजारात आंब्यांची आवक वाढल्यानंतर द्राक्षांची आवक कमी होत जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्षांची लागवड चांगली झाली होती तसेच द्राक्षांचा मागणीही राहिली. द्राक्षांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. द्राक्षांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, असे मोरे यांनी सांगितले.

सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर परिसरातून मार्केट यार्डातील फळबाजारात द्राक्षांची आवक होत आहे. मध्यंतरी झालेल्या हवामान बदलामुळे द्राक्षांच्या गोडीवर परिणाम झाला होता. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर द्राक्षांची गोडी वाढली असून द्राक्षांची प्रतवारीही चांगली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत द्राक्षांची आवक सुरू राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अरविंद मोरे, द्राक्ष व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड