पिंपरी : विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका तरुणाने लग्न करण्याचे आश्वासन देऊन एका महिलेची दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २०२३ पासून १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावरून मैत्री करून, लग्न करण्याचे आश्वासन दिले. आरोपीने त्याच्या आई-वडिलांच्या आजारपणाचे आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश, क्रेडिट कार्ड आणि बँकेतून एकूण १४ लाख ४४ हजार ७०० रुपये घेतले. त्यापैकी ३ लाख ९३ हजार ९१ रुपये परत करून उर्वरित १० लाख ५१ हजार ६०९ रुपये परत न करता, त्याने फिर्यादीशी लग्न करण्यास नकार दिला आणि फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत हॉटेल रेटिंगच्या नावाखाली फसवणूक

भोसरी येथील एका महिलेची हॉटेलला रेटिंग देऊन पैसे कमावण्याच्या नावाखाली दोन लाख १२० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

एका ३१ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत टेलीग्राम अकाउंट वरून संपर्क साधला. त्यांना हॉटेल रेस्टॉरंटला पाच स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्याचा टास्क दिला. सुरुवातीला आरोपीने फिर्यादीला काही पैसे ट्रान्सफर करून त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर मिळालेले पैसे बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करून अधिक नफा देण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने आरोपीने नऊ ट्रान्झॅक्शनद्वारे एक लाख १२ हजार ४० रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुगलवर सर्च करून मोबाईल नंबर मिळवला. या नंबरच्या धारकाने स्वतःला एनपीसीआयचा अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला त्यांच्या यूपीआय आयडीवर ८८ हजार ८० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. एकूण दोन लाख १२० रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सदनिका नोंदणीच्या नावाखाली ५४ लाखांची फसवणूक

रावेत येथील एका इमारतीमध्ये सदनिका नोंदणीच्या नावाखाली ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली.

या प्रकरणी युवकाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून सदनिकेचे बांधकाम पूर्ण न करता, त्याचा ताबा न देता, फिर्यादी आणि त्यांच्या मित्राकडून धनादेश आणि आरटीजीएसद्वारे एकूण ५४ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. आरोपींनी या संपूर्ण रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि फिर्यादीची फसवणूक केली. तसेच, आरोपींनी फिर्यादीला धमकी देखील दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीप्रकरणी दोघांना अटक

मोशीतील उप बाजार समितीतील भुसार मार्केट येथून वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.

राजकुमार महालिंग बागल (३५, आल्हाट वस्ती, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरली गेली होती. पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (२९, खंडोबा मंदिर, कुटे कॉलनी, आळंदी, पुणे) आणि ज्ञानेश्वर गजानन इंगोले (३२, कुटे कॉलनी, आळंदी) यांना अटक केली आहे.

कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

कोयता बाळगल्याप्रकरणी थेरगाव येथे दोघांना अटक करण्यात आली. पोलिस शिपाई तौसीफ शेख यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य नागनाथ माने (१९, शिवतीर्थनगर, थेरगाव) आणि विशाल उर्फ मन्या उर्फ विशाल भीमराव कांबळे (२१, थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी चैतन्यकडे एक लोखंडी कोयता आणि आरोपी विशाल कांबळेकडे चार कोयते असे एकूण पाच लोखंडी कोयते पोलिसांना आढळून आले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

फुगेवाडीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

फुगेवाडीतील पुलाखालील वाहनतळात एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (१९ ऑगस्ट) करण्यात आली.

पोलिस शिपाई नवनाथ पोटे यांनी या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर श्याम गायकवाड (२१, दापोडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी सागर ४५ हजार रुपये किमतीची देशी सिल्वर रंगाची पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशीरपणे बाळगताना आढळला. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

चिखलीत बेकायदेशीरपणे कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

मोरे वस्ती, चिखली येथील मोकळ्या मैदानात एका तरुणाला बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचा कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई बाबासाहेब गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजनकुमार इंद्रदेव राजभर (२९, मोरेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी राजनकुमारकडे ४० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी स्टीलसारखा गावठी बनावटीचा कट्टा कोणताही परवाना नसताना पोलिसांना मिळून आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

वाकडमध्ये पिस्तुल आणि काडतुस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

वाकडमध्ये एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

या प्रकरणी सहाय्यक फौजदार नरेश बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद अंकुश कळंबे (२१, पर्वती दर्शन, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि १००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस विनापरवाना बाळगलेले आढळून आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

गांजा बाळगणाऱ्या महिलेला अटक

चिखली येथील भांगरे कॉलनी, पाटीलनगर येथे एका महिलेला बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई चंद्रकांत जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका ३२ वर्षीय महिलेला (पाटीलनगर, चिखली, पुणे) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना आरोपी महिलेकडे १३०० रुपये किमतीचा २६ ग्रॅम गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगलेला आढळला. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करत आहेत.