पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भाेसरीतील औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणार आहे. हे केंद्र एमआयडीसीने दिलेल्या टाटा माेटर्सच्या मालवाहतूक प्रवेशद्वारासमाेरील माेकळ्या भूखंडावर (प्लाॅट क्रमांक एफ-टू ब्लाॅक) येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने २२ काेटी ८४ लाख ७५ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
सद्य:स्थितीत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे सुमारे १६ हजार सूक्ष्म, लघुउद्योग सुरू आहेत. या १६ हजार उद्योगांमध्ये सात लाख कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. लघु उद्योग वाहनांचे सुटे भाग (ऑटोमोबाइल्स पार्टस) संरक्षण विभागाला लागणारे सुटे भाग, प्रेस पार्ट, रबर, प्लास्टिक, इंजिनीअरिंग कंपन्यांसाठीचे फॅब्रिकेशन उत्पादन करतात. शहरातील मोठ्या उद्योगांसह विदेशातील उद्याेगांना हे सुटे भाग पुरविले जातात.
एमआयडीसीतील एखाद्या कंपनीला आग लागल्यास संत तुकारामनगर येथील अग्निशमन केंद्रावर अवंलबून रहावे लागत हाेते. हे अंतर लांब असल्याने बंब येण्यास विलंब होत असल्याने उद्याेजकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत हाेते. उद्याेगांसाठी एमआयडीसी परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे, यासाठी एमआयडीसीने भाेसरी येथील प्लाॅट क्रमांक एफ-टू ब्लाॅक येथे भूखंड राखीव ठेवला हाेता. या भूखंडावर अग्निशमन केंद्र उभारण्याची पिंपरी-चिंचवड लघु उद्याेग संघटनेची अनेक वर्षांपासून मागणी हाेती. यासंदर्भात उद्याेग मंत्र्यांकडे बैठका झाल्या. त्यानंतर महापालिकेने हालचाली केल्या. अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी मे. एनव्हायराेसेफ कन्सल्टंट यांची नेमणूक केली. त्यानंतर महापालिकेने २२ काेटी ८४ लाख ७५ हजार ५७६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
चार मजल्यांचे केंद्र
अग्निशमन केंद्र चार मजल्याचे असणार आहे. तळमजल्यावर पाच अग्निशमन वाहनांसाठी वाहनतळ, नियंत्रण, मीटर खोली, मटेरियल स्टाेअर, उद्वाहक (लिफ्ट) जिना, पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिला जवानांसाठी आराम खोली, दुसऱ्या मजल्यावर संगणक कक्ष, प्रशिक्षण हॉल, ग्रंथालय, तिसऱ्या आणि चाैथ्या मजल्यावर दाेन सदनिका असणार आहेत.
एमआयडीसीने अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिला आहे. याठिकाणी अत्याधुनिक असे अग्निशमन केंद्र आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. या केंद्रामुळे एमआयडीसी आणि परिसरातील रहिवाशी भागात आगीच्या घटना घडल्यास ती विझविण्यासाठी मदत हाेणार आहे. – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे, अशी अनेक वर्षांची मागणी होती. याबाबत उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने बैठका झाल्या होत्या. या मागणीला आता यश आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेसह केंद्र उभारावे. केंद्राचे काम लवकरात-लवकर पूर्ण करावे. – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्याेग संघटना