पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चोविसावाडी अग्निशमन केंद्रात व्यायाम करत असताना अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. चऱ्होली) असे मृत जवानाचे नाव आहे. राजेश हे व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या चोविसावाडीतील अग्निशमन केंद्रात व्यायामशाळा आहे. तिथे जवान व्यायाम करतात. राजेश हे मंगळवारी सायंकाळी व्यायामशाळेत व्यायाम करत होते. व्यायामादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
त्यामुळे थोडा वेळ आराम करतो असे सांगून ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चार महिन्यांपूर्वी भरती
राजेश हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील होते. ते अविवाहित असून, त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. राजेश हे चार महिन्यांपूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती झाला होते.
