फटाके विक्रीत ३० ते ४० टक्के घट; मंदीसदृश वातावरण, पावसाचाही परिणाम

पुणे : दिवाळीत यंदा फटाक्यांचा आवाज घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारपेठेतील मंदीसदृश वातावरण, धनत्रयोदशीपर्यंत पडलेल्या पावसाचा फटका फटाका विक्रीला बसला. यंदा फटाका विक्रीत ३० ते ४० टक्के घट झाल्याचे निरीक्षण फटाका विक्रेत्यांकडून नोंदवण्यात आले आहे.

दिवाळीचे तीन-चार दिवस फटाक्यांचे असतात. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फटाके उडवले जातात. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत रस्त्याच्या आजूबाजूला, सोसायटय़ांच्या आवारात फटाक्यांचा कचरा मोठय़ा प्रमाणात साठलेला असतो. मात्र, यंदा दिवाळीच्या दिवसांतही पावसाळी वातावरण असल्याने हे चित्र विशेष पाहायला मिळाले नाही. पाऊस आणि बाजारपेठेतील मंदीसदृश वातावरणामुळे फटाक्यांच्या बाजारपेठेत काहीशी शांतताच होती. लक्ष्मीपूजनाचा काळ वगळता यंदा फटाक्यांच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून आले. विशेषत आवाजी फटाक्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले.

महापालिकेकडून घाऊक फटाका विक्रेत्यांना परवाना देण्यातील गोंधळामुळे यंदा फटाका विक्री सुरू करण्यास बराच उशीर झाला. त्यातच धनत्रयोदशीपर्यंत पाऊस होता. त्यामुळे दिवाळीपूर्वी होणारी फटाक्यांची विक्री जवळपास झालीच नाही. दिवाळीच्या दोन-तीन दिवसांतच फटाके विक्री झाली. त्या शिवाय मंदीसदृश वातावरणाचाही बऱ्यापैकी परिणाम झाला. त्यामुळे यंदा एकूण फटाका विक्रीत ३० ते ४० टक्के घट झाली, असे निरीक्षण फटाका वेल्फेअर असोसिएशनचे सचिव नीलेश अगरवाल यांनी नोंदवले.

घाऊक बाजारपेठेप्रमाणेच किरकोळ बाजारातही फटाक्यांना फारसा उठाव नव्हता. विशेषत पावसाचा फटाक्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. दिवाळीपूर्वी आणि धनत्रयोदशीपर्यंत पाऊस असल्याने फटाक्यांची फारशी विक्री होऊ शकली नाही. त्यानंतरचे तीन-चार दिवसच विक्रीसाठी मिळाले. त्यात काही प्रमाणात व्यवसाय झाला, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के घट झाली, असे फटाका विक्रेते हेमंत अगरवाल म्हणाले.

आवाजी फटाके नको रे बाबा!

ध्वनी प्रदूषण, आवाजी फटाक्यांविषयी वाढलेल्या जागृतीमुळे आवाजी फटाक्यांची विक्रीही मोठय़ा प्रमाणात कमी झाली. माळा, अ‍ॅटमबॉम्ब, लक्ष्मी फटाका अशा आवाजी फटाक्यांना यंदा विशेष मागणी नव्हती. तर फुलबाजी, अनार, भुईचक्र अशा बिनआवाजाच्या फटाक्यांसह आकाशात रोषणाई करणाऱ्या फॅन्सी फटाक्यांना जास्त मागणी होती. ग्राहक स्वतहून आवाजी फटाके नकोत असे सांगतात. आवाजी फटाक्यांची विक्री कमी होणे, जागृती वाढणे ही चांगलीच गोष्ट असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या काळात केंद्र शासनाने घालून दिलेल्या निकषांची पूर्तता करणारे ‘हरित फटाके’ बाजारात येतील, असेही विक्रेत्यांनी नमूद केले.

अग्निशामकचा दूरध्वनी वाजलाच नाही

पिंपरी : नेहमीच्या धडाकेबाज दिवाळीचा अनुभव पाहता यंदा िपपरी- चिंचवड या उद्योगनगरीतही फटाक्यांचे प्रमाण यंदा बऱ्यापैकी घटले. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी झालेला पाऊस, पर्यावरणविषयक जागृती तसेच पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा काटकसर करण्याची भूमिका अशी विविध कारणे त्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे फटाक्यामुळे होणारे अपघात तथा दुखापत होण्याचे प्रकारही जाणवले नाहीत. अग्निशामक दलाला दिवाळीत अशाप्रकारचा एकही दूरध्वनी आला नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.  सर्वाधिक फटाके लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजवले जातात. मात्र, त्या दिवशी पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी पाडव्याला पावसाची रिपरिप सुरूच होती. त्याचा परिणाम फटाके वाजवण्यावर झाला. नेहमी फटाक्यांच्या आवाजामुळे डोकेदुखीचा अनुभव घेणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने हा सुखद धक्का होता.