पुण्यातील वारजे भागातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नीलेश घारे यांच्या चारचाकी वाहनावर काल रात्री दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.तर, या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घारे यांच्या वाहनांवर काल रात्री ११ ते ११.३० दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार एकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुझी मातीच करतो, अशी धमकी देण्यात आली : नीलेश घारे मला काल दुपारी एकाचा फोन आला. तुला बघून घेतो. तू अति केलंस, तुझी माती करतो. तू माझ्या विषयाच्या मध्ये येतोयस, असं बोलण्यास त्यानं सुरुवात केली. नेमकं काय झालं, याबाबत मी विचारल्यावर त्यानं फ़ोन ठेवून दिला. त्यानंतर मी पोलीस सह-आयुक्तांची भेट घेऊन, मला एकानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच फोनवर झालेलं सर्व संभाषण त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी मला दुसऱ्या विभागात तक्रार देण्यास सांगितली. त्यानंतर मी तेथून ऑफिसमध्ये आलो आणि काम करू लागलो.
रात्रीच्या ११ ते ११.३० च्या दरम्यान ऑफिसच्या बाहेर असलेल्या चारचाकी गाडीवर दुचाकीवरून येऊन फायरिंग केलं. बाहेर काय झालं हे पाहण्यासाठी आल्यावर, गाडीची काच फुटल्याचे दिसले आणि हा आवाज ऐकून माझे कार्यकर्तेदेखील जमा झाल्याचे फिर्यादी नीलेश घारे यांनी त्यांच्यासोबत घडलेला घटनाक्रम त्यांनी सांगितला.