पशुपालनाची थोडी वेगळी मात्र जगभरात सर्वाधिक वेड असलेली हौस म्हणजे मासे पाळणे. कुत्र्या-मांजरासारखे हाकेला प्रतिसाद देत नसले, पायात घोटाळून लाड करून घेत नसले तरी या मत्स्यपालकांचा जीव आपापल्या अ‍ॅक्वॅरिअममध्ये गुंतलेला असतो. एरवी सहसा न दिसणारी पाण्याखालची दुनिया आपल्या घरात छोटय़ा स्वरूपात उभी करण्यासाठी मत्स्यपालक जंग जंग पछाडताना दिसतात आणि त्यांची ही हौस भागवण्यासाठी बाजारपेठ नेहमीच सज्ज असते.

इजिप्शियन संस्कृतीत प्राचीन काळापासून शोभेचे मासे पाळण्यात येत असल्याचे दाखले मिळतात. साधारण ऐंशीच्या दशकात भारतात चाळींपासून बंगल्यांपर्यंत अशा सर्व स्तरात अगदी १० घरांमागे एका घराच्या बैठकीच्या खोलीत अ‍ॅक्वॉरिअमने स्थान मिळवले. नव्याने सुरू झालेल्या सर्व छोटय़ा-मोठय़ा हॉटेलांमध्ये अ‍ॅक्वॉरिअम हवेच हा जणू अलिखित नियमच झाला होता. त्यानंतर आजपर्यंत मत्स्यपालनाची ही हौस अविरत आहे किंबहुना ती वाढतेच आहे.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

सातत्याने बदलते ट्रेंड्स

मत्स्यपालनातील ट्रेंडही सातत्याने बदलत असलेले दिसून येतात. ‘ऑर्नामेंट फिश’ म्हणजे गोडय़ा पाण्यातील शोभेचे मासे आणि ‘मरीन फिश’ म्हणजे खाऱ्या पाण्यातील शोभेचे मासे असे ढोबळमानाने माशांचे वर्गीकरण होते. ऑर्नामेंट फिशच्या जवळपास ६०० प्रजातींची नोंद आतापर्यंत झाली आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन बाजारपेठेने साथ दिल्यामुळे खाऱ्या पाण्यातील मासे पाळण्याकडे कल आहे. अगदी लाखो रुपये खर्चून परदेशी प्रजाती विकत घेऊन त्या बाळगण्याचे प्रमाणही वाढते आहे. याशिवाय काही खेकडे, विशिष्ट वनस्पतींसाठीची मागणीही वाढत आहे. अगदी ६० रुपये जोडीपासून ते लाखो रुपये किमतीचे शोभेचे मासे मिळतात. प्रत्येक माशाच्या प्रजातीनुसार खाणे मिळते, सजावटीचे साहित्य, वेगवेगळे दगड, शेवाळाच्या काही प्रजाती, वनस्पती, पाणी स्वच्छ ठेवण्याची उपकरणे आणि छोटय़ाश्या बरणीपासून मासे बाळगण्यासाठी मोठय़ा पेटय़ा अशी ही बाजारपेठ विस्तारली आहे. गल्लोगल्ली असलेल्या दुकानांबरोबरच ऑनलाईन बाजारपेठही तेजीत आहे. अनेक परदेशी प्रजातींचे व्यवहार या ऑनलाईन बाजारपेठेत होत असतात. मत्स्यपालनाच्या हौशीवर उभ्या असलेल्या बाजारपेठेत भारताचे स्थानही जगात महत्त्वाचे आहे. भारतातून जवळपास अडीचशेहून अधिक ऑर्नामेंटल फिशच्या प्रजाती, चाळीसहून अधिक एक्झॉटिक फिशच्या प्रजातींची निर्यात होते.

अक्वास्केपिंग,स्वच्छतेची सेवा

दिवाणखान्याच्या सजावटीमध्ये अ‍ॅक्वॉरिअमला विशेष महत्त्व गेल्या काही वर्षांपासून आले आहे. या अ‍ॅक्वॉरिअमची रचना करून देण्याचा व्यवसाय म्हणजे अ‍ॅक्वास्केपिंग. गेल्या दोन वर्षांपासून हा नवा व्यवसाय या बाजारपेठेत आकर्षण ठरला आहे. अ‍ॅक्वॉरिअमची रचना कशी असावी, प्रकाशयोजना कशी असावी, घरातील इतर सजावटीनुसार कोणत्या प्रजाती असाव्यात, कोणत्या वनस्पती असाव्यात याची आखणी अ‍ॅक्वास्केपिंगची सेवा देणारे व्यावसायिक करून देतात. अ‍ॅक्वॉरिअम घराच्या सजावटीला शोभेसे, सुटसुटीत आणि आकर्षक दिसावे याचे मार्गदर्शन हे व्यावसायिक करतात. यांबरोबरच अ‍ॅक्वॉरिअमची स्वच्छता राखण्याची सेवा पुरवण्याचा व्यवसायही तेजीत आहे.

अ‍ॅक्वॉरिअम थेरपी

प्रत्येक माशाचा स्वभाव, त्याच्या सवयी या वेगळ्या असतात. एका पेटीत ठेवल्या जाणाऱ्या विविध प्रजातींच्या माशांचे एकमेकांशी जुळणे आवश्यक असते तसेच घरातील वातावरणाशी जुळणेही गरजेचे असते. हे तत्त्व प्राथमिक मानून अ‍ॅक्वॉरिअम थेरपी ही संकल्पना फोफावली. घरातील वातावरण, आवडीनिवडी, माणसांचे स्वभाव यानुसार माशांची निवड केली जाते. माशांचा चपळपणा, स्वभाव, रंग यांनुसार त्यांची निवड करण्यात येते. ताण कमी करण्यासाठी अ‍ॅक्वॉरिअम उपयोगी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यावरही अनेक मतभेद दिसून येतात.